सूर्य मावळल्याशिवाय चंद्र उगवत नाही ; श्रीनिवास पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:27 IST2021-01-13T04:27:37+5:302021-01-13T04:27:37+5:30
पुणे : पुरोगामी विचारांनी कार्य करणाऱ्या शारदाबाई समाजासाठी काम करत होत्या. न्यायमूर्ती रानडे, पंडिता रमाबाई यांच्या सेवासदनाचा विचार प्रभाव ...

सूर्य मावळल्याशिवाय चंद्र उगवत नाही ; श्रीनिवास पाटील
पुणे : पुरोगामी विचारांनी कार्य करणाऱ्या शारदाबाई समाजासाठी काम करत होत्या. न्यायमूर्ती रानडे, पंडिता रमाबाई यांच्या सेवासदनाचा विचार प्रभाव त्यांच्यावर होता. बाईंच्या विचारांमध्ये खूप मोठी ताकद होती. त्यांनी मुलांवर खूप चांगले संस्कार केले. दुर्दैवाने त्यांना मुलांचे वैभव पाहता आले नाही. तसेच मुलगा मुख्यमंत्री झालेला पाहता आला नाही. सूर्य मावळल्याशिवाय चंद्र उगवत नाही, अशा शब्दांत स्व. शारदाबाई गोविंदराव पवार यांच्या कार्याबद्दलच्या भावना खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केली.
राजमाता जिजाऊ आदर्श पालक पुरस्कार समिती आयोजित राजमाता जिजाऊ आदर्श पालक पुरस्कार वितरण सोहळ्यात पाटील बोलत होते. डॉ. रंजनी इंदुलकर, मनोहर सासणे, विक्रमसिंह राजे माधवराव, माजी आमदार योगेश टिळेकर आदी उपस्थित होते. यावेळी ग्रंथतुला करण्यात आली. स्व. शारदाबाई पवार यांना जाहीर झालेला पुरस्कार नीला सासणे यांनी स्वीकारला. अंजनाबाई लहाने, नगरसेविका रंजना टिळेकर, अभिनेत्री प्रिया बेर्डे, नर्मदाबाई सोरटे, शालन गिरमकर, सुमन शेंडकर, सुमन वायकर, सहारा मुलाणी, मिनल शहा, रुक्मिणी जगताप, सिंधू ननवरे महिलांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बेर्डे म्हणाल्या की, चित्रपट क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टकोन समाजात फार वेगळा आहे. आमचा हा पिढीजात व्यवसाय आहे. चित्रपटामध्ये काम करणाऱ्या महिलांना सणवार नसतात, असे बोलले जाते. मात्र माझ्या घरात सर्व सणवार साजरे होतात. देश ,राष्ट्र खंबीर होण्यामागे महिला असतात. त्याचा पाया जिजाऊ मँासाहेब, सावित्रीबाई यांनी रचला आहे. पुरुष एकवेळ ढासळेल मात्र महिला खंबीरपणे उभी राहते. लक्ष्मीकांत बेर्डेचे निधन झाले त्यावेळी परिस्थिती वाईट होती. एकटीने मुलांचा सांभाळ केला. प्रत्येकवेळी पैसाच जगण्यासाठी उपयोगी नसतो तर त्यासाठी पाठिंबा महत्वाचा ठरतो.
प्रशांत सातव यांनी प्रास्ताविक केले. विक्रम ननावरे यांनी सूत्रसंचालन केले .