अल्पवयीन विद्यार्थिनीचा शिक्षकाकडून विनयभंग
By Admin | Updated: July 16, 2014 04:16 IST2014-07-16T04:16:28+5:302014-07-16T04:16:28+5:30
कुंजीरवाडी येथील ग्रामीण सर्वांगीण विकास विद्यालयाच्या शिक्षकाने शाळेत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा प्रकार १४ रोजी सकाळी ८.३० च्या दरम्यान घडला.

अल्पवयीन विद्यार्थिनीचा शिक्षकाकडून विनयभंग
उरुळी कांचन : कुंजीरवाडी येथील ग्रामीण सर्वांगीण विकास विद्यालयाच्या शिक्षकाने शाळेत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा प्रकार १४ रोजी सकाळी ८.३० च्या दरम्यान घडला. मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे या शिक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. विजयकुमार दत्तात्रय गवळी (वय ५१, रा. पेटकर वस्ती कुंजीरवाडी) या शिक्षकास पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही मुलगी (वय १४) आपल्या आई - वडील व भाऊ यांच्यासह कुंजीरवाडी येथे राहते. आई शेतमजूर म्हणून काम करते. मुलीची शाळा सकाळी ७ ते १२.३० अशी आहे. संबंधित शिक्षक हा या मुलीच्या वर्गाला शास्त्र विषय शिकवतो. या मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार हा शिक्षक वर्गात आल्यावर वह्या तपासण्याच्या बहाण्याने मुलींजवळ जाऊन त्यांच्या गालाला हात लावणे, पाटीवर थाप मारणे, कमरेजवळ हात लावणे, असे लज्जा उत्पन्न होणारे प्रकार सातत्याने म्हणजे सुमारे एक वर्षापासून करीत आहे. तिने हा प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. त्यांनी कुंजीरवाडी येथील सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने लोणी काळभोर पोलीस स्टेशनला जाऊन विजयकुमार दत्तात्रय गवळी यांचे विरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी य शिक्षकावर भादंवि कलम ३५४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, तपासासाठी त्यास ताब्यात घेतले आहे. (वार्ताहर)