मोदीसरकारने गोरगरीब जनतेला रस्त्यावर आणले: भन्साळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:09 IST2021-05-31T04:09:29+5:302021-05-31T04:09:29+5:30
भाववाढीला चालना देणारा मुख्य घटक म्हणजे वाहतुकीसाठी वापरात येणारे पेट्रोल व डिझेल. मात्र, हे सरकार सत्तेवर आल्यानंतर सातत्याने ...

मोदीसरकारने गोरगरीब जनतेला रस्त्यावर आणले: भन्साळी
भाववाढीला चालना देणारा मुख्य घटक म्हणजे वाहतुकीसाठी वापरात येणारे पेट्रोल व डिझेल. मात्र, हे सरकार सत्तेवर आल्यानंतर सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ होत जाऊन डिझेल शंभरीच्या जवळ पोहोचले आहे, तर पेट्रोलने शंभरी ओलांडली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटून मोठ्या उद्योगपतींना फायदा देऊन भांडवलदार धार्जिणे धोरण व खासगीकरण करून सार्वजनिक मालमत्ता भाजप धार्जिण्या मोठ्या उद्योगपतींच्या वैयक्तिक मालकीच्या करून देण्याचेच षडयंत्र या सरकारने राबवलेले आहे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे ज्या अदानींची मालमत्ता दीडलाख कोटींची होती ती लॉकडाऊनच्या काळात साडेआठ लाख कोटींवर पोहोचली, हेच म्हणावे लागेल.
शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून त्यांना त्रास होईल असे कायदेविना चर्चा मंजूर करून शेतकरीवर्गावर अन्याय केलेला आहे. हे पण एक दुष्कृत्यच आहे. सर्वसामान्य जनता त्यांच्या या कट कारस्थानाला वैतागली असून यातून कधीही उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही देविदास भन्साळी यांनी पुढे सांगितले. तरुणांना रोजगाराचे आमिष दाखवून गेल्या सात वर्षांत त्यांच्या हाताला काम न देता वेठबिगार केले आहे, तसेच जे तरुण उद्योग-धंदा करून स्वतःच्या पायावर उभे राहत होते, त्यांच्या उद्योग व्यवसायांना शासनाकडून अनेक चुकीच्या नियमांच्या कचाट्यात पकडून बंद करण्यास भाग पाडले व तरुणांची बेकारी वाढवली त्याबद्दल त्यांचा निषेधच करायला पाहिजे. दरडोई उत्पन्नामध्ये भारत देशाला मागे ठेवण्याचे काम मोदी-शहा जोडगोळीने की करून देशाची अर्थव्यवस्था मोडकळीस आणली आहे. त्यांचा करावा तेवढा निषेध थोडाच आहे.