सूरज अडागळे टोळीवर मोक्का कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:09 IST2021-02-07T04:09:57+5:302021-02-07T04:09:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जुन्या भांडणावरून मयूर आरडे याच्यावर कोयत्याने वार करून जिवे मारण्याच्या हेतूने मारहाण करून दोन्ही ...

Mocca action against Suraj Adagale gang | सूरज अडागळे टोळीवर मोक्का कारवाई

सूरज अडागळे टोळीवर मोक्का कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जुन्या भांडणावरून मयूर आरडे याच्यावर कोयत्याने वार करून जिवे मारण्याच्या हेतूने मारहाण करून दोन्ही हातांची करंगळीजवळील बोटे तोडण्याच्या गुन्ह्यात सहकारनगर पोलिसांनी ९ जणांवर गुन्हा दाखल केला होता. सूरज अडागळे व त्याच्या टोळीने हा हल्ला केला होता. अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी सूरज अडागळे व त्याच्या ६ साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.

सूरज अडागळे, आनंद ऊर्फ सोनू सिद्धेश्वर धडे (फरार), एजाज ऊर्फ रॅगी इसाक शेख, मोन्या ऊर्फ अपूर्व संजय खंडागळे, मंदार खंडागळे, नागेश ढावरे, केदार खंडागळे अशी आरोपींची नावे आहेत.

मनोज ढावरे व मयूर आरडे यांच्यात भांडण झाले. या कारणावरून ६ डिसेंबर २०२० रोजी पहाटे ५ वाजता तळजाई वसाहतीतील घरासमोर आरडे याच्यावर आरोपींनी कोयत्याने वार करून जखर जखमी केले होते. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. तपासात सूरज अडागळे याने संघटित टोळी तयार करून हा खुनीहल्ला केल्याचे निष्पन्न झाले. संघटित टोळीच्या माध्यमातून अडागळे याने टोळीची दहशत कायम ठेवण्याच्या उद्देशाने खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, गंभीर दुखापत, तडीपारीचा भंग, विनयभंग, बाल लैंगिक अत्याचार, शस्त्रजवळ बाळगणे असे गुन्हे सातत्याने केले आहेत.

सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद गंभीरे यांनी उपायुक्त सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्याकडे मोक्का कारवाईचा प्रस्ताव पाठविला. डॉ. शिंदे यांनी या प्रस्तावाला मंजूर दिली असून सहायक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर यांच्याकडे तपास सोपविण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर लक्ष देऊन गंभीर गुन्ह्यांच्या ठिकाणी स्वत: भेट देऊन कठोर व कडक कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले. गुन्ह्याचा सखोल तपास करुन गुन्हेगारीच्या समुळ उच्चाटनावर भर देण्याचा आदेश दिला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोका अंतर्गत केलेली ही पाचवी कारवाई आहे. नव्या वर्षातील ही दुसरी कारवाई आहे.

Web Title: Mocca action against Suraj Adagale gang