मोबाईलमुळे मुले बनताहेत एकलकोंडी !
By Admin | Updated: October 3, 2015 01:47 IST2015-10-03T01:47:09+5:302015-10-03T01:47:09+5:30
काय करणार मोबाईल हातात दिल्याशिवाय तो एक घास खात नाही... मोबाईलशिवाय तो राहातच नाही आणि सतत रडत राहतो... काय करावे कळेनासे झालंय... असे संवाद घरोघरी ऐकू येतात.

मोबाईलमुळे मुले बनताहेत एकलकोंडी !
पुणे : काय करणार मोबाईल हातात दिल्याशिवाय तो एक घास खात नाही... मोबाईलशिवाय तो राहातच नाही आणि सतत रडत राहतो... काय करावे कळेनासे झालंय... असे संवाद घरोघरी ऐकू येतात. मुलांना गेम खेळण्यासाठी किंवा गाणी ऐकणे, व्हीडिओ पाहणे यासाठी सतत मोबाईल लागतो. पण याचा त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम धोकादायक आणि दूरगामी असल्याचे चित्र आहे.
मोबाईलचा सातत्याने वापर केल्याने मुले एकलकोंडी, हट्टी होतात. सुरुवातीला गंमत म्हणून हातात दिला जाणारा मोबाईल कालांतराने सवय बनतो आणि ही गोष्ट मुलांच्या सामाजिक आणि वैयक्तिक आरोग्यासाठीही धोकादायक होत आहे. अनेकदा मुले धमकीही देण्यास पुढे-मागे पाहत नाहीत, असे चिकित्सा मानसोपचारतज्ज्ञ उज्ज्वल नेने यांनी सांगितले. यात ८ वर्षे वयोगटापासून पुढील मुलांचा समावेश असतो. मोबाईल न दिल्यास मी जेवणार नाही, शाळेत जाणार नाही, अभ्यास करणार नाही, घर सोडून जाईन अशा प्रकारच्या धमक्याही मुले पालकांना देतात. ५ वर्षे वयाच्या आतील मुलांच्या हातात सतत मोबाईल असेल तर त्यांचा बौद्धिक विकास खुंटतो, त्यांच्या भाषिक क्षमतांवर मर्यादा येतात. तसेच काही मुले स्वमग्न झाल्याचीही उदाहरणे आहेत.
सततच्या मोबाईल वापराने कल्पनाशक्ती खुंटते, बुद्धीला चालना मिळेनाशी होते तसेच मोबाईलच्या स्क्रीनकडे सातत्याने पाहिल्याने डोळ्यांवर ताण येतो, स्क्रीनकडे पाहून डोळे कोरडे होतात, डोळ्यांतून पाणी येते, असे डॉ. जाई केळकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)