रेडी स्टेडी गो....आणि पिंपरी-चिंचवडला मेट्रो धावली!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 09:12 PM2020-01-10T21:12:11+5:302020-01-10T21:16:35+5:30

दीड किलोमीटर धावली ट्रेन

Metro test successful at Pimpri-Chinchwad | रेडी स्टेडी गो....आणि पिंपरी-चिंचवडला मेट्रो धावली!

रेडी स्टेडी गो....आणि पिंपरी-चिंचवडला मेट्रो धावली!

Next
ठळक मुद्देमेट्रोची चाचणी पिंपरी-चिंचवडला यशस्वीसुरक्षा विभागाला अहवाल पाठवणारपिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गात पिंपरी-चिंचवड ते दापोडी या भागाला प्राधान्य

पुणे: पिंपरी-चिंचवड येथे शुक्रवारी दुपारी घेण्यात आलेली मेट्रोची चाचणी यशस्वी झाली. संत तुकारामनगर स्थानकापासून पुढे दीड किलोमीटर अंतरावर तीन डब्यांची ट्रेन कोणताही अडथळा न येता धावली. चाचणी घेण्याआधी महामेट्रोनो सर्व सक्षम यंत्रणांकडून परवानगी घेतली होती. आता चाचणीचा अहवाल त्या यंत्रणांना पाठवला जाईल.
उन्नत मार्गावर ट्रेन चढवून त्यावर चाचणी घेण्याची ही पहिलीच वेळ होती. ती यशस्वी झाल्यामुळे सर्व तंत्रज्ञ व कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. नागपूरहून पुण्यात नुकत्याच प्रत्येकी तीन डब्यांच्या दोन ट्रेन आल्या आहेत. त्यापैकी एक ट्रेन शुक्रवारी थेट मार्गावर चालवण्यात आली. संत तुकारामनगर स्थानकापासून पुढे दीड किलोमीटर अंतरावर विद्यूत खांबांची सर्व जोडणी पुर्ण झाल्यामुळे ही चाचणी घेण्यात आली. 
पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गात पिंपरी-चिंचवड ते दापोडी या भागाला प्राधान्य देण्यात आले आहे. त्याचे अंतर ७ किलोमीटर आहे. त्यात एकूण ७ स्थानके असली तरी प्राधान्याने फक्त संत तुकाराम नगर व फुगेवाडी अशी दोन स्थानकेच सुरू करण्यात येणार आहेत. त्यातील संत तुकाराम नगर मार्गावर दीड किलोमीटर अंतरापर्यंत मेट्रो लागणारी वीज पुरवणारे खांब बसवून पुर्ण झाले आहेत. त्यामुळे ही चाचणी घेण्यात आली.
मेट्रोला वीज पुरवठ्यासाठी वल्लभनगर येथे स्वतंत्र सबस्टेशन तयार करण्यात आले आहे. तिथून मेट्रोला २४ तास पुरवठा होईल. त्याप्रमाणे आज ही चाचणी घेण्यात आली. महामेट्रोच्या या विभागाचे कार्यकारी संचालक देवेंद्र मिश्रा व त्यांची पुर्ण टिम यावेळी उपस्थित होती. मेट्रो दीड किलोमीटर पुढे व नंतर पुन्हा मागे आणण्यात आली. कोणत्याही अडथळ्याविना ही चाचणी यशस्वी झाली. 
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी संपुर्ण टीमचे अभिनंदन केले. पुढील मार्गावरचे विद्यूत खांब बसवण्याचे कामही सुरू आहे. येत्या काही दिवसात ते पुर्ण होईल. त्यानंतर या पुर्ण प्राधान्य मार्गावर चाचणी घेतली जाईल असे ते म्हणाले.  पुणे मेट्रोसाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट असून आता लवकरच वनाज ते गरवारे महाविद्यालय या प्राधान्य मार्गाचेही काम पुर्ण केले जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

Web Title: Metro test successful at Pimpri-Chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.