मेरे पास बच्चन है...!; पुण्याच्या बालरंजनमध्ये उलगडला अमिताभ यांचा संघर्षमय जीवनप्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 14:54 IST2017-12-07T14:51:40+5:302017-12-07T14:54:46+5:30
नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. निमित्त होते बालरंजन केंद्राच्या ३०व्या वर्धापनिदिनाचे. अमिताभ यांच्या पंच्चाहत्तरीचे औचित्य साधून त्यांनी बच्चन यांचे संघर्षमय जीवन मुलांसमोर उलगडण्याचे ठरवले.

मेरे पास बच्चन है...!; पुण्याच्या बालरंजनमध्ये उलगडला अमिताभ यांचा संघर्षमय जीवनप्रवास
पुणे : भारतीय चित्रपटसृष्टीचे अनभिषिक्त सम्राट असलेल्या अमिताभ बच्चन यांचा शालेय मुलांवरही जबरदस्त पगडा आहे. त्याचेच प्रत्यंतर बालरंजन केंद्रांच्या संयोजकांना आले. मुलांसाठी म्हणून त्यांनी अमिताभ यांच्या पंच्चाहत्तरीनिमित्त त्यांनी आयोजित केलेल्या बच्चन यांच्या कारकिर्दीच्या आढाव्याला प्रचंड प्रतिसाद मिळाले. इतका की त्यानंतर सगळीच मुले मेरे पास बच्चन है असे म्हणतच घरी गेली.
नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. निमित्त होते बालरंजन केंद्राच्या ३०व्या वर्धापनिदिनाचे. अमिताभ यांच्या पंच्चाहत्तरीचे औचित्य साधून त्यांनी बच्चन यांचे संघर्षमय जीवन मुलांसमोर उलगडण्याचे ठरवले. त्यांना सिद्धार्थ केळकर यांची साथ मिळाली. मुलांसमोर त्यांनी मोजक्याच शब्दात बच्चन यांना उभे केले. मुलांनीही त्यांना मनोमन दाद दिली.
अमिताभ याचा अर्थ सूर्य! त्याचे सुरूवातीचे दिवस, चित्रपटसृष्टित लंबूटांग्या म्हणून झालेली मानहानी, ज्या आवाजाच्या सामर्थ्यावर त्यांनी सर्व काही कमावले, तोच आवाज आकाशवाणीने एकेकाळी चांगला नाही म्हणून नाकारला होतो हे ऐकून मुले आश्चर्यचकित झाली. कोणीही खचून जाईल अशा या अवस्थेतून बच्चन यांनी अखेर चित्रपटसृष्टी कशी काबीज केली यातून मुलांनाही चांगली प्रेरणा मिळाली.
सगळे काही संपले असे असतानाच फिनिक्स पक्षाप्रमाणे कौन बनेगा करोडपती मधून त्यांनी कशी उभारी घेतली व त्या लहान पडद्यावरही ते कसे एकमेव ठरले हेही केळकर यांनी मुलांना सांगितले. सहस्त्रुबद्धे म्हणाल्या, प्रसिद्ध व्यक्तींचे फक्त ग्लॅमर समाजाला दिसते, पण त्यामागची मेहनत आज समजली.
पल्लवी गोखले व शौनक केळकर यांनी सिद्धार्थ केळकर यांना सादरीकरणात सहकार्य केले. माधवी केसकर यांनी आभार मानले.