पुणे: बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयातील भूलशास्त्र विभागात दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या महिलाडॉक्टरने विभागप्रमुख, वरिष्ठ डॉक्टरांकडून सातत्याने मानसिक छळ होत आहे. त्यामुळे माझ्यामध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे मनस्ताप होत असून, मला त्रास देणाऱ्यांवर योग्य कारवाई करावी आणि न्याय मिळावा, अशी मागणी डॉ. प्रियांका राख यांनी पत्रकार परिषदेत केली.
डॉ. राख म्हणाल्या की, त्यांना वरिष्ठ डॉक्टरांकडून त्या मानसिकरित्या आजारी असल्याचा वारंवार उल्लेख करत त्यांचा छळ केला जातो. तसेच, सध्या घेत असलेले शिक्षण सोडण्याचाही सल्ला दिला जातो. शिवाय त्यांना रुग्णांवर उपचार करण्यापासूनही रोखले जाते. वरिष्ठांकडून अशा पद्धतीने मानसिक छळ होत असल्याने दरवर्षी काही विद्यार्थी सोडून जात आहेत. त्यामुळे काॅलेजचे नाव बदनाम होत आहे. मी मानसिक आजारी आहे असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु ससूनमधील मानसोपचार विभागाने मला मानसिक आजार नसल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. तरीही त्या ‘पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर’ने ग्रस्त असल्याचे त्यांना वारंवार सांगितले जाते, त्यामुळे माझे मानसिक संतुलन ढासळत आहे, असे त्या म्हणाल्या.
याबाबत आरोप करण्यात आलेल्या ससूनमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, संबंधित महिला डाॅक्टरने केलेल्या आरोप खोटे आणि चुकीचे आहेत. त्यांच्या प्रत्येक तक्रारीवर समिती नेमून चौकशी केली गेली आहे, असे त्या म्हणाल्या.