पुणे : पुणे विभागात हडपसर सॅटेलाइट टर्मिनलच्या विकासासाठी नॉन-इंटरलॉकिंग आणि प्री-नॉन-इंटरलॉकिंग कामे करण्यात येणार आहेत. या कामांमुळे १७ ते २० जुलैदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर, काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांनी आपली यात्रा नियोजनपूर्वक करावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पुणे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी हडपसर टर्मिनलचा विकास करण्यात येत आहे. या टर्मिनलचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करायचे आहे. त्यादृष्टीने नवीन तयार करण्यात आलेल्या रेल्वेलाईन मुख्य रेल्वे मार्गाला जोडण्याचे काम सुरू आहे. त्या दृष्टिकोनातूनच हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामध्ये २० जुलै रोजी १७ तासांचा नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक (रात्री १२ ते सायंकाळी ५ पर्यंत ट्रॅफिक ब्लॉकसह) घेण्यात येणार आहे. या कामाचा परिणाम अनेक प्रवासी गाड्यांवर होणार आहे. त्या दिवशी एकूण १७ गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. यामध्ये पुणे-दौंड डेमू, दौंड-बेलवंडी, पुणे- हरंगुळ एक्स्प्रेस, पुणे-सोलापूर इंटरसिटी एक्स्प्रेस अशा प्रमुख गाड्यांचा समावेश आहे. प्रवाशांनी या कालावधीत आवश्यक नसलेला प्रवास टाळावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या गाड्या टर्मिनेट केल्या आहेत
-हडपसर-जोधपूर पुण्याहून धावेल, तर जोधपूर -हडपसर पुण्यापर्यंत धावेल.
-हडपसर - काझीपेठ दाैंड स्थानकावरून सुटेल.
-हडपसर - सोलापूर एक्स्प्रेस लोणी स्थानकावरून सुटेल.
-सीएसएमटी - बंगळुरू उद्यान एक्स्प्रेस चार तास उशिराने धावेल.
-सीएसएमटी - चेन्नई रविवारी पुण्याहून एक तास उशिरा धावेल.