महिला मोर्चाचे उपाध्यक्षपद देऊन मेधा कुलकर्णी यांचे ‘पुनर्वसन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:08 IST2021-06-22T04:08:58+5:302021-06-22T04:08:58+5:30

पुणे : कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची पुन्हा एकदा भाजपने समजूत काढत, त्यांचे राजकीय पुनर्वसन करून नाराजी दूर ...

Medha Kulkarni's 'rehabilitation' by giving the post of vice president of Mahila Morcha | महिला मोर्चाचे उपाध्यक्षपद देऊन मेधा कुलकर्णी यांचे ‘पुनर्वसन’

महिला मोर्चाचे उपाध्यक्षपद देऊन मेधा कुलकर्णी यांचे ‘पुनर्वसन’

पुणे : कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची पुन्हा एकदा भाजपने समजूत काढत, त्यांचे राजकीय पुनर्वसन करून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे़ भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाचा मान दिला आहे. महाराष्ट्र राज्यातून असलेल्या एकमेव जागेसाठी कुलकर्णी यांची सोमवारी निवड जाहीर करण्यात आली आहे़

भाजपसाठी सर्वात सुरक्षित विधानसभा मतदारसंघ असलेल्या कोथरूडमधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या चंद्रकांत पाटील यांना पक्षाने उमेदवारी दिल्याने, मेधा कुलकर्णी भलत्याच नाराज झाल्या होत्या़ त्यानंतर पक्षाच्या कित्येक कार्यक्रमांना गैरहजर राहून त्यांनी आपली नाराजीही व्यक्त केली़ तर त्या पक्षाच्या कुठल्याच पदावरही कार्यरत राहिल्या नाहीत़ या काळात त्यांनी स्वत:चा स्वतंत्र असा जनसंपर्क कायम ठेवला़ दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी कुलकर्णी यांना विधान परिषदेवर संधी देण्यात येईल असे सांगण्यातही आले़ परंतु, हे आश्वासनही आश्वासनच राहिले व तेथेही त्यांना संधी नाकारण्यात आली़

पुणे महापालिकेत नगरसेवक राहिलेल्या व कोथरूडमधून सन २०१४ मध्ये आमदार झालेल्या कुलकर्णी यांची नाराजी दूर करण्यासाठी, सध्या पक्षाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे़ ही नियुक्ती करण्यापूर्वीच पक्षातील अन्य वरिष्ठांनीही त्यांची भेट घेऊन या पदाचा स्वीकार करावा, भविष्यात तुम्हाला मोठी संधी दिली जाईल, असा पुन्हा एकदा शब्द दिला असल्याचे समजते आहे़

-------------------------------

महिला संरक्षण, उत्कर्षासाठी कार्यरत राहणार

भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी संधी दिल्याबद्दल पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांसह केंद्रीय समितीचे आभार मानत कुलकर्णी यांनी, या पदावर काम करीत असताना महिला संरक्षणासह महिलांच्या उत्कर्षावर प्राधान्याने कार्य करणार असल्याचे सांगितले आहे़

------------------------

Web Title: Medha Kulkarni's 'rehabilitation' by giving the post of vice president of Mahila Morcha