दिवंगत कोविड योद्ध्यांच्या वारसांना महापौरांच्या हस्ते २५ लाखांचा धनादेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:12 IST2021-04-01T04:12:10+5:302021-04-01T04:12:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना आपत्तीत सेवा बजावत असताना डिसेंबर २०२० अखेर कोरोना संसर्गामुळे बाधित होऊन दिवंगत झालेल्या ...

दिवंगत कोविड योद्ध्यांच्या वारसांना महापौरांच्या हस्ते २५ लाखांचा धनादेश
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना आपत्तीत सेवा बजावत असताना डिसेंबर २०२० अखेर कोरोना संसर्गामुळे बाधित होऊन दिवंगत झालेल्या महापालिकेच्या पाच सेवकांच्या वारसांना आज प्रातिनिधीक स्वरूपात महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते प्रत्येकी २५ लाख रूपये देण्यात आले़
पुणे महापालिका कामगार कल्याण निधीतून कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे बाधित होऊन दिवंगत सेवकांच्या वारसास ‘कोरोना विषाणू (कोव्हिड-१९) प्रतिबंध व उपचार सुरक्षा कवच योजना’ लागू करण्यात आली होती़ यात डिसेंबर २०२० अखेर ५१ (४७ कायम सेवक व ४ कंत्राटी सेवक) अधिकारी/ सेवकांचा कोरोना संसर्ग होऊन निधन झाले़ सदर योजनेंतर्गत सर्व मृत सेवकांच्या वारसांना २५ लाख रूपये व वारसास महापालिकेत नोकरी देण्यात येणार आहे़
बुधवारी यापैकी पाच जणांच्या वारसांना महापौरांच्या दालनात प्रातिनिधिक स्वरूपात २५ लाखांचा धनादेश, सन्मानपत्र व शाल देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या वेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर व आदी पदाधिकारी तसेच अधिकारी उपस्थित होते.
--
फोटो : कोरोना संसर्गामुळे बाधित होऊन दिवंगत झालेल्या महापालिकेच्या पाच सेवकांच्या वारसांना आज प्रातिनिधिक स्वरूपात महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते प्रत्येकी २५ लाखांचा धनादेश देण्यात आला.
(फोटो - कोविड पीएमसी सत्कार नावाने आहे)