महापौर निवडणूक २५ रोजी होणार
By Admin | Updated: February 13, 2016 03:21 IST2016-02-13T03:21:17+5:302016-02-13T03:21:17+5:30
महापौर दत्तात्रय धनकवडे व उपमहापौर आबा बागुल यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदांसाठी येत्या २५ फेब्रुवारीला निवडणूक घेण्याचे निर्देश विभागीय आयुक्तएस. चोक्कलिंगम

महापौर निवडणूक २५ रोजी होणार
पुणे : महापौर दत्तात्रय धनकवडे व उपमहापौर आबा बागुल यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदांसाठी येत्या २५ फेब्रुवारीला निवडणूक घेण्याचे निर्देश विभागीय आयुक्तएस. चोक्कलिंगम यांनी दिले आहेत. महापौर व उपमहापौर यांच्या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून २० फेब्रुवारी रोजी राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
या निवडणुकीसाठी पीठासन अधिकारी म्हणून पीएमपीचे अध्यक्ष अभिषेक कृष्णा यांची निवड करण्यात आली आहे. निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याने इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. महापौर व उपमहापौर यांचा कार्यकाल अडीच वर्षांचा आहे, मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने सव्वा-सव्वा वर्षासाठी महापौर पदासाठी संधी देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार दत्तात्रय धनकवडे यांनी सव्वा वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार काँग्रेसचे आबा बागुल यांनाही उपमहापौरपदाचा राजीनामा सादर केला आहे. महापौरांच्या राजीनाम्याला मुख्य सभेची मंजुरी मिळाल्यानंतर तो विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला. त्यानुसार नवीन महापौर व उपमहापौर निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी (दि. २५) सकाळी ११ वाजता ही निवडणूक होणार आहे. महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे प्रशांत जगताप, बाबूराव चांदेरे, दीपक मानकर, बाळासाहेब बोडके, विकास दांगट पाटील, नंदा लोणकर, सुभाष जगताप, दिलीप बराटे या इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. उपमहापौर पदासाठी मुकारी आलगुडे, सुधीर जानज्योत, सुनंदा गडाळे, सतीश लोंढे , मिलिंद काची, लता राजगुरू यांनी अर्ज केले आहेत. येत्या २० फेब्रुवारीला पक्षाकडून उमेदवाराची निवड जाहीर होण्याची शक्यता आहे.