जेजुरीचा मर्दानी दसरा... 'येळकोट येळकोट'च्या जयघोषात सीमोल्लंघनासाठी सोहळा मार्गस्थ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2023 19:04 IST2023-10-24T19:02:43+5:302023-10-24T19:04:03+5:30
येळकोट येळकोट च्या जयघोषात आणि भंडार खोबऱ्याच्या मुक्त हस्ताने उधळणीत आज जेजुरी गडावर मर्दानी दसऱ्याला सुरुवात झाली.

जेजुरीचा मर्दानी दसरा... 'येळकोट येळकोट'च्या जयघोषात सीमोल्लंघनासाठी सोहळा मार्गस्थ
जेजुरी: येळकोट येळकोट च्या जयघोषात आणि भंडार खोबऱ्याच्या मुक्त हस्ताने उधळणीत आज जेजुरी गडावर मर्दानी दसऱ्याला सुरुवात झाली. खऱ्या अर्थाने जेजुरीकरांचा हा उत्सव असल्याने गडकोटात ग्रामस्थ आणि भाविकांची मोठी गर्दी झाली होती. अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या तीर्थक्षेत्र जेजुरीचा दसरा उत्सव हा जगप्रसिद्ध मानला जातो. संपूर्ण डोंगर रांगामधून रमणारा हा सोहळा एक वेगळीच अनुभूती देत असल्याने या सोहळ्याला मर्दानी दसरा असे संबोधले जाते.
आज सायंकाळी ६ वाजता जेजुरी गडकोटात देवाचे मानकरी, खांदेकरी, सेवेकरी, ग्रामस्थ आणि भाविकांनी मोठी गर्दी केली होती. देवाचे मानाकऱ्यांनी इशारत करताच खांदेकऱ्यांनी पालखी उचलली. यावेळी पेशवे, खोमणे, आदी मानकऱ्यांसह मुख्य विश्वस्त पोपट खोमणे, अड्. पांडुरंग थोरवे, अड् विश्वास पानसे, मंगेश घोणे, राजेंद्र खेडेकर अनिल सौन्दडे उपस्थित होते.
सदानंदाच्या जयघोषात आणि भांडाऱ्याच्या उधळणीत सोहळ्याने मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालून सोहळ्याने सीमोल्लंघणासाठी गडकोटाबाहेर प्रस्थान ठेवले. सायंकाळी ७ वाजता सोहळा वाजत गाजत, फटाक्यांची आतिषबाजी करीत गडकोटाबाहेरील पश्चिमेला टेकडीवर विसावली.