बारामती:मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेला जीआर हा ओबीसी आरक्षण संपविणारा ‘काळा कागद’ असल्याचा घणाघाती आरोप ओबीसी आंदोलनाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी केला आहे. पवार कुटुंबाने महाराष्ट्रातीलओबीसी आरक्षण संपविल्याचा थेट हल्लाबोल करत त्यांनी शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका करत मराठा आरक्षणाच्या नावाखाली बोगस प्रमाणपत्रे काढून ओबीसींचे हक्क हिसकावले जात असल्याचा दावा हाके यांनी केला.
बारामतीत ओबीसी समाजाच्या वतीने आयोजित एल्गार मेळाव्यात ते बोलत होते. मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलकांनी वासुदेव आणि पोतराजाच्या पारंपरिक वेशभूषेत भाग घेतला. सभेत बोलताना प्रा. हाके यांनी पवार कुटुंबीयांना लक्ष्य केले. ‘ग्रामपंचायतीच्या पॅनल प्रमुखापासून ते मंत्रिपदापर्यंत हेच लोक आहेत. कोणाचीही सत्ता येवो, अर्थमंत्री अजित पवारच असतात,’ असे ते म्हणाले. राज्यात गावोगाव ५० टक्क्यांपेक्षा अधिक ओबीसी समाज असूनही, ओबीसी संबंधित योजनांसाठी फुले-शाहू-आंबेडकरांच्या नावाने राज्य करणारे पवार कुटुंबीय अवघा १ टक्का निधीची तरतूद करतात, असा आरोप हाके यांनी केला.
हाके यांनी सारथी संस्थेच्या भव्य कार्यालयाची तुलना शेअर मार्केटशी करत ओबीसींसाठी मात्र केवळ १००० चौरस फूट कार्यालय देण्यात आल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली. तसेच मराठा नेते मनोज जरांगे यांना शरद पवार यांनी उभे केल्याचा गंभीर आरोप हाके यांनी केला. ‘गावातील राजकारणावरील पकड मजबूत होण्यासाठी हे षडयंत्र रचले गेले आहे. मराठा आरक्षणाच्या जीआरमुळे ओबीसींचे आरक्षण आज संपले आहे,’ असे ते म्हणाले.
मंडल आयोगाच्या अंमलबजावणीबाबतही हाके यांनी स्पष्ट भूमिका मांडली. ‘शरद पवार यांनी मंडल आयोग लागू केला हा गैरसमज आहे. असा दावा करणाऱ्याचे कानफाड फोडा. मंडल आयोग हा संपूर्ण देशात लागू झाला, केवळ राज्यात नव्हे. या आयोगाची चळवळ शेकापचे दि. बा. पाटील, बबनरावजी ढाकणे, शिवाजीभाऊ शेंडगे, छगन भुजबळ, अरुण कांबळे आणि बाळासाहेब आंबेडकर यांनी लढवली,’ असे हाके म्हणाले. शरद पवार यांनी ‘मनोज जरांगे नावाचे भूत’ महाराष्ट्राच्या मानगुटीवर उभे केले असल्याची प्रखर टीका त्यांनी केली. ओबीसींची मते घेऊन त्यांचे आरक्षण हिसकावले जात असल्याचे सांगत हाके यांनी ओबीसींना जागृत करण्याचे आवाहन केले. येत्या काळात १२ जिल्ह्यांतून संघर्ष यात्रा काढण्याची घोषणा हाके यांनी केली. या यात्रेत ओबीसींची एकजूट दाखवण्याचे आवाहन त्यांनी केले.
भाषण सुरू असताना प्रकाश आंबेडकर यांचा हाकेंना फोन
मेळाव्यात प्रा. हाके यांचे भाषण सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा फोन आला. हाके यांनी मोबाइल स्पीकर ऑन करून आंबेडकर यांना उपस्थितांशी बोलण्याची संधी दिली. आंबेडकर म्हणाले, ‘ओबीसींचे आरक्षण ओबीसींनाच राहिले पाहिजे. हे भांडण लावणारे शासन आहे. जबरदस्तीने दिलेले आरक्षण आहे. त्यासाठी मोठी लढाई लढावी लागेल. आपल्याला रस्त्यावर उतरावे लागेल.’ आंबेडकर यांच्या या बोलण्याने मेळाव्यात उत्साह निर्माण झाला.
पवारांकडून नियमात खाडाखोड
हाके यांनी शरद पवार यांच्यावर आणखी एक हल्ला चढवला. ‘ज्येष्ठ नेते शरद पवार हे ४०० संस्थांचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष राहील, असा नियम होता. मात्र, त्यात खाडाखोड करून शरद पवार अध्यक्ष झाले. व्हीएसआयचेही ते अध्यक्ष झाले,’ अशी टीका हाके यांनी केली.