पुणे: देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मुंबईत काही अनुचित घडावे, असे त्यांनाही वाटत नसेल, मात्र योग्य निर्णय घेण्याची जबाबदारी त्यांचीच आहे व ते तसा निर्णय घेतील, असा विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमित ठाकरे यांनी व्यक्त केला.
पुण्यातील मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी ठाकरे सोमवारी पुण्यात आले होते. पत्रकारांबरोबर बोलताना ते म्हणाले, याआधीही मराठा आरक्षण आंदोलक मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांना आश्वासने देऊन परत पाठवले. ही आश्वासने त्यांना कोणी दिली होती? ती पाळली गेली का? हा मुख्य प्रश्न आहे. तो आम्ही विचारला की आम्ही भूमिका बदलली असे म्हटले जाते. आमची भूमिका आहे तीच आहे. ती मुळीच बदललेली नाही. मनोज जरांगे परत मुंबईत का आले, हे ज्यांनी त्यांना मागील वेळी मुंबईतून परत पाठवले होते, त्यांनीच सांगावे. यात काहीही चुकीचे नाही.
हा प्रश्न लोकांनीच आता संबंधितांना विचारावा, असे ठाकरे म्हणाले. मुंबईत आलेल्या आंदोलकांना अन्न व पाणी मिळालेच पाहिजे. हे सरकारचे कर्तव्यच आहे. या प्रश्नाकडे सरकारने गंभीरपणे पाहावे, अशी मागणी ठाकरे यांनी केली. आंदोलक ज्या मागण्या करत आहेत, त्या पूर्ण करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे का? हे त्यांना स्पष्टपणे सांगितले गेले पाहिजे. यातून मार्ग निघावा, काहीतरी तोडगा निघावा, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली.