रिक्षा बंदमुळे अनेकांची तारांबळ

By Admin | Updated: March 17, 2015 00:21 IST2015-03-17T00:21:30+5:302015-03-17T00:21:30+5:30

रिक्षाचालकांनी पुकारलेल्या बंदमुळे सोमवारी रुग्णांचे हाल झाले; तर विद्यार्थ्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली. दिवसभर क्वचितच एखादी रिक्षा रस्त्यावर प्रवासी वाहतूक करताना दिसली.

Many people have died due to rickshaw pull | रिक्षा बंदमुळे अनेकांची तारांबळ

रिक्षा बंदमुळे अनेकांची तारांबळ

पुणे : रिक्षाचालकांनी पुकारलेल्या बंदमुळे सोमवारी रुग्णांचे हाल झाले; तर विद्यार्थ्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली. दिवसभर क्वचितच एखादी रिक्षा रस्त्यावर प्रवासी वाहतूक करताना दिसली. काही ठिकाणी प्रवासी नेणाऱ्या रिक्षाचालकांना इतर चालकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यामुळे प्रवाशांनीही संताप व्यक्त केला.
विविध मागण्यांसाठी डॉ. बाबा आढाव यांच्या रिक्षा पंचायतीने सोमवारी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला होता. शहरात रिक्षा पंचायतीचे ४० हजारांपेक्षा जास्त रिक्षाचालक सदस्य आहेत. बहुतेक सर्वच रिक्षाचालकांनी उत्स्फूर्तपणे या बंदला पाठिंबा देत रिक्षा रस्त्यावर आणली नाही. काही रिक्षा संघटनांनी या बंदला पाठिंबा न देता रिक्षा रस्त्यावर उतरविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या संघटनांच्या रिक्षाही फारशा रस्त्यावर दिसल्या नाहीत. सकाळी काही भागांत रिक्षांची तुरळक वाहतूक सुरू होती. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र दुपारी एरवी रिक्षांनी भरून जाणारे शहरातील मुख्य रस्ते ओस पडले होते. तसेच सर्वच रिक्षा थांबेही रिकामे होते. रुग्णालयांबाहेरील रिक्षा थांब्यांवर एकही रिक्षा दिसत नव्हती. बस थांबे, एसटी स्थानकाबाहेरही रिक्षांची ये-जा दिसली नाही.
शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाहतूक दररोज सकाळी रिक्षांमार्फत मोठ्या प्रमाणावर केली जाते. मात्र, सोमवारी रिक्षा बंदमुळे पालकांनाच धावपळ करावी लागली. स्वत:च्या वाहनाने किंवा बसने मुलांना शाळेत ने-आण करावी लागली.
बंदचा फटका रुग्णांना बसला. रुग्णालयात जाणाऱ्या; तसेच रुग्णालयातून उपचारानंतर घरी सोडण्यात आलेल्या अनेक रुग्णांचे वाहनांअभावी हाल झाले. रिक्षाशिवाय केवळ बसचाच पर्याय असल्याने त्यांना रणरणत्या उन्हात पायी चालत जात जवळचे बसस्थानक गाठावे लागले. बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांचेही रिक्षाअभावी हाल झाले. बसेसची नीट माहिती नसल्याने प्रवासादरम्यान त्यांची तारांबळ उडाली. काहींनी नातेवाइकांना फोन करून वाहन बोलावून घेतले. त्यासाठी बराच काळ ताटकळत उभे राहावे लागले. काहींनी खासगी रेडिओ कॅबला पसंती दिली. अनेकांनी रिक्षा बंदमुळे घराबाहेर जाणेही टाळले. सायंकाळनंतर रिक्षा रस्त्यावर येऊ लागल्या.

शहराच्या काही भागात प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांची बंदमध्ये सहभागी झालेल्या रिक्षाचालकांनी अडवणूक केल्याचे प्रकार घडले.
रिक्षामध्ये बसलेल्या प्रवाशांनाही खाली
उतरविण्यात आले. त्यामुळे या प्रवाशांची गैरसोय झाली. याबाबत बोलताना रिक्षा पंचायतीचे निमंत्रक नितीन पवार म्हणाले, की शहरात असे तुरळक प्रकार घडल्याचे कानावर आले आहे. चार ठिकाणी रिक्षाचालकांची अडवणूक केल्याचे समजते. या घटना वगळता पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षाचालकांनी उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभाग घेतला. त्यामुळे बंद शंभर टक्के यशस्वी झाला.

कॅबच्या काचा फोडल्या
खासगी कॅबमुळे रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम होऊ लागला आहे. सोमवारी बंदच्या काळात सकाळी काही रिक्षाचालकांनी पुणे स्टेशन परिसरात काही कॅबच्या काचा फोडून आपला राग व्यक्त केला. बंद पुकारण्यामागे रिक्षाचालकांनी कॅबला प्रवासी वाहतूक करण्यासाठी परवान्याचाही प्रमुख मुद्दा आहे. त्यामुळे सोमवारी बंदची संधी साधत रिक्षाचालकांनी कॅबला लक्ष्य केले.

रिक्षावाल्यांचा त्रासही जरा समजावून घ्या : बाबा आढाव
पुणे : रिक्षा बंद राहिल्याने ज्यांना त्रास झाला, त्यांनी रिक्षावाल्यांना असलेला त्रासही समजावून घेतला पाहिजे, असे सांगतानाच रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी आमच्या प्रश्नातही लक्ष घाला, असे आवाहन पुणेकरांना केले.
डॉ. आढाव पत्रकारांना या आंदोलनाबाबत म्हणाले, ‘आम्हाला सार्वजनिक सेवकाचा दर्जा मिळावा, विम्याचा हप्ता कमी करावा, अशा अनेक मागण्यांकडे लक्ष दिले गेलेले नाही. रिक्षा बंद राहिल्याने वृद्धांना त्रास झाला, असे बोलले जाते, पण थोडीशी अडवणूक करून रिक्षावाल्यांच्या मागण्या पुढे केल्या तर बिघडले कोठे?’
दरम्यान, आजच्या बंदच्या पाशर््वभूमीवर डॉ. आढाव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केवळ सहल परवाना असलेल्या रेडिओ कॅबवर शहरात व्यवसाय करण्यास तातडीने बंदी घालावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. सी. एन. जी.चा पुरवठा सुरळीत व नियमित करावा, ई रिक्षांना व्यवसायास परवानगी देऊ नये, रिक्षाचे रात्रीचे भाडे पूर्वीसारखेच पन्नास टक्के केले जावे, रिक्षाच्या जोखमीच्या प्रमाणात विमा हप्ता घेतला जावा व पूर्वीप्रमाणेच हे काम परिवहन विभागाकडे द्यावे आदी मागण्यांचा समावेश निवेदनात आहे.

Web Title: Many people have died due to rickshaw pull

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.