आळंदीत माऊली नामाचा गजर; भाविकांनी पावसाच्या सरी झेलत घेतले संजीवन समाधीचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 08:05 PM2022-07-10T20:05:29+5:302022-07-10T20:05:42+5:30

आषाढी एकादशी निमित्ताने पहाटे घंटानाद, पवमान अभिषेक व दुधारती झाली

many citizens visit to sanjivan samadhi in alandi | आळंदीत माऊली नामाचा गजर; भाविकांनी पावसाच्या सरी झेलत घेतले संजीवन समाधीचे दर्शन

आळंदीत माऊली नामाचा गजर; भाविकांनी पावसाच्या सरी झेलत घेतले संजीवन समाधीचे दर्शन

Next

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत देवशयनी आषाढी एकादशी निमित्त हजारो भाविकांनी पावसाच्या सरी झेलत माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. रविवारी अलंकापुरी टाळ - मृदंगाचा गजराने आणि माऊली नामाच्या जयघोषाने दुमदुमून निघाली. तत्पूर्वी, आषाढी एकादशी निमित्ताने पहाटे घंटानाद, पवमान अभिषेक व दुधारती झाली. त्यानंतर भाविकांना दर्शनबारीतून माऊलींच्या संजीवन समाधी दर्शनासाठी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश देण्यात आला. यावेळी वारकऱ्यांचा आनंद ओसंडून वाहत आहे. दर्शनबारीतून भाविकांनी माऊलींच्या संजीवन समाधीचे मनोभावे दर्शन घेतले.

दरम्यान पंढरीत लाखों वारकऱ्यांच्या उपस्थितीत आषाढी एकादशी साजरी होत आहे. मात्र ज्या भाविकांना पंढरपूरला जाणे शक्य झाले नाही; अशा असंख्य भाविकांना आळंदीत माऊलींचरणी आपली वारी समर्पित केली. एकादशी निमित्त शहरातील विविध मंदिरे, मठ आणि धर्मशाळांमध्ये कीर्तन, प्रवचन आणि भजने असे धार्मिक कार्यक्रम पार पडले. आळंदीत दिवसभर हलक्या पावसाच्या सरी कोसळत होत्या. तरीही भाविकांनी मोठ्या श्रद्धेने पवित्र इंद्रायणीचे दर्शन घेत माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले. अनेक भाविक माऊलींचे मुखदर्शन, स्पर्श दर्शन आणि मंदिर कळस दर्शन घेऊन धन्यता मानत होते. दिवसभरात सुमारे १५ ते २० हजारांहून अधिक भाविकांनी समाधीचे दर्शन घेतल्याची माहिती देवस्थानचे मुख्य व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली.

भाविकांना पवित्र इंद्रायणीत स्नानासाठी मज्जाव

 मागील दोन दिवसांपासून इंद्रायणी उगमस्थान मावळ परिसरात  सुरू असलेल्या पावसामुळे पवित्र इंद्रायणी नदीला महापूर आला आहे. आळंदीतील इंद्रायणीचे दोन्ही काठ पाण्याखाली गेले आहेत. तर भक्ती - सोपान पूल  व भक्त पुंडलिक मंदिर पाण्याखाली गेले आहे. यापार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांना पवित्र इंद्रायणीत स्नानासाठी मज्जाव करण्यात आला आहे. तसेच खबरदारी म्हणून नदीपात्रात बोटी तैनात करण्यात आल्या आहेत.

Web Title: many citizens visit to sanjivan samadhi in alandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.