‘मानसीचा चित्रकार’ माहितीपटाद्वारे रसिकांसमोर येणार....

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 05:16 PM2018-11-14T17:16:46+5:302018-11-14T17:35:34+5:30

महाराष्ट्रातील एखाद्या चिंतनशील चित्रकाराच्या कलात्मक जडणघडणीवर अशा प्रकारचा माहितीपट साकार होण्याची कदाचित ही पहिलीच वेळ आहे.   

'Mansi Chitrakar' will be seen in front of public | ‘मानसीचा चित्रकार’ माहितीपटाद्वारे रसिकांसमोर येणार....

‘मानसीचा चित्रकार’ माहितीपटाद्वारे रसिकांसमोर येणार....

Next
ठळक मुद्दे‘ब्रश मायलेज’ हा माहितीपट 56 मिनिटांचाया माहितीपटात परांजपे यांची चित्रे,आयुष्यात आलेले चढउतार,बालपण असा प्रवास

नम्रता फडणीस  
पुणे : कुंचल्याद्वारे कॅनव्हासवर चित्रकृती चितारणारा मानसीचा चित्रकार..कला क्षेत्रातील प्रतिष्ठेचा दयावती मोदी पुरस्कार प्राप्त झालेला एकमेव कलाकार...'शिखरे रंग-रेषांची' या पुस्तकाद्वारे चित्रकलेविषयी प्रकट चिंतन करणारा लेखक...समाजामध्ये चित्रसाक्षरता प्रस्थापित व्हावी यासाठी झटणारा हाडाचा शिक्षक अशा विविध प्रतिमांमधून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे आता ‘ब्रश मायलेज’ या माहितीपटाद्वारे रसिकांच्या भेटीस येत आहेत.   
अ‍ॅनिमेशन फिल्ममेकर दत्तप्रसाद मेटे यांनी चित्रकार रवी परांजपे यांच्यावर माहितीपट निर्मितीचे शिवधनुष्य पेलत ही चित्रमूर्ती घडविली आहे. शालेय स्तरावर कला विषय दुय्यम समजला जात असताना रवी परांजपे यांच्यासारखा एक चित्रकार पन्नास वर्षांपासून कलेचे महत्व, कलेचे जीवनातील स्थान,अभिजाततेला सर्जनशीलतेचे लाभलेले कोंदण, कलेतून होणारी राष्ट्राची प्रगती अशा अनेक पैलूंमधून रसिकांमध्ये चित्रसाक्षरता निर्माण करण्यासाठी झटत आहे. कलेकडे पाहाण्याची वेगळी दृष्टी देणारा त्यांचा आश्वासक प्रवास विचार करायला लावणारा आहे.महाराष्ट्रातील एखाद्या चिंतनशील चित्रकाराच्या कलात्मक जडणघडणीवर अशा प्रकारचा माहितीपट साकार होण्याची कदाचित ही पहिलीच वेळ आहे.   


या माहितीपटाविष़यी लोकमत शी बोलताना दत्तप्रसाद मेटे म्हणाले, इंडियन अ‍ॅनिमेटेड फिल्म ही  कशी दिसली पाहिजे? ते इंडियन म्हणून वेगळे असले पाहिजे, डिस्नेची ती कॉपी होता कामा नये. वेस्टर्न अ‍ॅनिमेटेड फिल्मची कॉपी करून इंडियन व्हिज्युअल सादर करू शकत नाही असा विचार मनात पक्का होता. लहानपणापासून रवी परांजपे सरांची चित्र बघून माहिती होती. एक माहितीपट करीत असताना त्यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. त्यांची चित्र जवळून पाहायला मिळाली. यापुढचा माहितीपट तुमच्यावर असू शकतो असे म्हटल्यावर त्यांनी ब-याच विचाराअंती माहितीपट तयार करण्याची परवानगी दिली.मित्र लक्ष्मीकांत बोंगळे याच्यावर दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवली. या माहितीपटात हाफिस कॉंट्रँक्टर, पं. सुरेश तळवलकर, दिग्विजिय वैद्य, उस्ताद उस्मान खान, परांजपे सरांचे शिष्य राहुल देशपांडे आणि गोपाळ नांदूरकर, पत्नी स्मिता परांजपे, दत्तात्रय पाडेकर या सर्वांच्या मुलाखतीचा समावेश आहे. या माहितीपटात परांजपे यांची चित्रे,आयुष्यात आलेले चढउतार, बेळगावच्या घरात गेलेले बालपण, प्रात्यक्षिककार म्हणून केलेले काम, त्यातील तांत्रिकता, सरांची संगीताची असलेली आवड, आवडते गायक पं. भीमसेन जोशी यांच्या संगीताचा चित्रांवर झालेला परिणाम असा प्रवास मांडण्यात आला आहे. हा 56 मिनिटांचा दीर्घ माहितीपट आहे. हा माहितीपट जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.    
एखाद्या चित्रकाराचे चित्र देशविदेशात मोठ्या किंमतीला विकले गेले किंवा त्याच्या चित्राबददल एखादा वाद उदभवला तरच त्या  चित्रकाराविषयी अवगत होते. पण त्या चित्रकाराची दृश्यकला रसिकांपर्यंत पोहोचत नाही. यासाठी चित्रकारांचे डॉक्यूमेंटेशन होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: 'Mansi Chitrakar' will be seen in front of public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.