पुणे : सध्या आंब्याचा हंगाम सुरू असून, ते मोठ्या प्रमाणात कृत्रिमरीत्या पिकविले जात आहेत. आंबा पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर करण्यावर बंदी असताना काही विक्रेत्यांकडून कॅल्शियम कार्बाईड आणि एसिटीलीन गॅस याचा वापर केला जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने तपासणी मोहीम हाती घेतली असून, आंबा पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर झाल्यास कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
अन्न प्रशासनाकडून मार्केटयार्डात फळ व्यापारी आणि विक्रेत्यांची तपासणी मोहीम सुरू आहे. आंब्यासह इतर फळे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर केल्याचे आढळून आल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. आंबा पिकविण्यासाठी इथिलीन गॅसचा वापर करण्यास परवानगी असली तरी त्यासाठी विशिष्ट नियम आखून देण्यात आले आहे. त्याचे पालन फळ व्यापारी आणि विक्रेत्यांनी करावयाचे आहे. फळांवर थेट इथिलीनची फवारणी करण्यास मनाई आहे, अशीही माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली.