प्रभागातील उमेदवारी माघारीसाठी मनधरणी
By Admin | Updated: February 7, 2017 03:07 IST2017-02-07T03:07:30+5:302017-02-07T03:07:30+5:30
उमेदवारी अर्ज माघारी घेण्यास सुरुवात झाली असून, अर्ज माघारीची मुदत मंगळवारी दुपारी तीनपर्यंत आहे, त्यामुळे बंडोबांना थंड करण्यासाठी राजकीय पक्षांच्या नेत्यांचा कस लागला आहे

प्रभागातील उमेदवारी माघारीसाठी मनधरणी
पिंपरी : उमेदवारी अर्ज माघारी घेण्यास सुरुवात झाली असून, अर्ज माघारीची मुदत मंगळवारी दुपारी तीनपर्यंत आहे, त्यामुळे बंडोबांना थंड करण्यासाठी राजकीय पक्षांच्या नेत्यांचा कस लागला आहे. अपक्षांना भाव आला आहे, उमेदवारी माघारीसाठी मनधरणी केली जात आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक २१ फेब्रुवारीला होणार असून, निवडणुकीतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे काम पूर्ण झाले आहे. महापालिकेच्या १२८ जागांसाठी एकूण २ हजार ३०४ अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी छाननीत १४३ अर्ज बाद झाले. अर्जावर स्वाक्षरी नसणे किंवा विविध कागदपत्रे सादर न केल्यामुळे एकूण ४६ उमेदवारांना निवडणूक रिंगणातून बाहेर पडावे लागले. निवडणुकीसाठी १ हजार ३५८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारीची मुदत
आहे. त्यानंतरच ३२ प्रभागांत निवडणूक रिंगणात कोण उमेदवार आहेत, हे स्पष्ट होईल.
महापालिका निवडणुकीसाठी २७ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. या मुदतीत १२८ जागांसाठी २ हजार ३०४ अर्ज दाखल झाले. त्यामध्ये अनेक इच्छुकांनी एक किंवा दोन प्रभागात दोन किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीत एकूण १ हजार ३५८ अर्ज वैध ठरले आहेत. तर १४३ अर्ज बाद ठरले.(प्रतिनिधी)