मंचर-भीमाशंकर रस्त्याची चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 01:04 IST2018-10-02T01:03:44+5:302018-10-02T01:04:04+5:30
शिनोली : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

मंचर-भीमाशंकर रस्त्याची चाळण
शिनोली : मंचर-भीमाशंकर रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून, रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडाझुडपांमुळे रस्ता वाहतुकीस धोकादायक झाला आहे. श्रीक्षेत्र भीमाशंकर हे तीर्थक्षेत्र असून देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असून, हे सह्याद्रीच्या रांगामध्ये वसले आहे. या ठिकाणी अभयारण्य असल्यामुळे निसर्गरम्य ठिकाण आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावर भक्त भाविक व पर्यटक येत असतात.
मंचर-भीमाशंकर रस्ता पूर्णपणे ठिकठिकाणी खड्डेमय झाला असून, काही ठिकाणी तीन ते चार फुटांचे खड्डे पडले असून, वाहनचालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्डे चुकवताना वाहनांचे व दुचाकींचे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
खड्ड्यांमुळे गेले दोन-तीन महिन्यांमध्ये अपघातात काही निरपराध नागरिक मृत्युमुखी पडले असून, काही जखमी झाले आहेत. काही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे भक्त भाविकांमध्ये पर्यटक व नागरिकांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. गेले एक महिन्यापासून पाऊस उघडला असून, वेळोवेळी विनंती करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग खड्डे बुजवण्यास टाळाटाळ करत आहे.
याबाबत उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग घोडेगाव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की संबंधित ठेकेदाराला आपण खड्डे बुजवण्यास सांगितले आहे. यंत्रणा त्या ठिकाणी शिफ्ट केली आहे. गेली दोन-तीन दिवस पाऊस येत असल्यामुळे कामात व्यत्यय आला आहे. डांबराने खड्डे बुजवण्याचे काम दोन दिवसांत सुरू करण्यात येईल.