एकेरी वाहतुकीचा पहिलाच दिवस ठरला मनस्तापाचा

By Admin | Updated: June 12, 2017 21:10 IST2017-06-12T21:03:53+5:302017-06-12T21:10:58+5:30

लॉ कॉलेज रस्ता, प्रभार रस्ता आणि पौड रस्त्यावर करण्यात आलेल्या एकेरी वाहतुकीच्या प्रयोगामुळे पहिल्याच दिवशी वाहनचालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले

Manastapacha was the first day of passenger traffic | एकेरी वाहतुकीचा पहिलाच दिवस ठरला मनस्तापाचा

एकेरी वाहतुकीचा पहिलाच दिवस ठरला मनस्तापाचा

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 12 - लॉ कॉलेज रस्ता, प्रभार रस्ता आणि पौड रस्त्यावर करण्यात आलेल्या एकेरी वाहतुकीच्या प्रयोगामुळे पहिल्याच दिवशी वाहनचालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. सोमवारी सुरु करण्यात आलेल्या या प्रायोगिक बदलामुळे सकाळपासूनच कोंडीचा अनुभव वाहनचालकांना यायला सुरुवात झाली होती. विशेषत: एसएनडीटी महाविद्यालय आणि प्रभात रस्त्यावर वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. अनेक ठिकाणी नागरिकांचा संताप पहायला मिळत होता.
पौड रस्त्यावर साधारणपणपणे एसएनडीटी महाविद्यालयापासून पाठीमागे गुन्हे शाखेच्या कार्यालयाच्याही पुढे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पौड रस्त्यावरुन आलेल्या वाहनांना कॅनॉल रस्त्याने वळून पुढे आठवले चौकात जाताना वाहनचालकांचा गोंधळ उडत होता. आठवले चौकातून उजवीकडे बसेसना वळण घेताना अडचणी येत होत्या. मात्र, डाव्या बाजुला वळण घेऊन सरळ जाणारी वाहने मोकळ्या रस्त्यावरुन सुसाट जात होता.
लॉ कॉलेज रस्त्यावरील वाहतून प्रभात रस्ता जंक्शनवरुन डावीकडे वळविण्यात आली होती. पुढे उजवीकडे कॅनॉल रस्त्याने वळण घेताना मात्र वाहनचालकांची तारांबळ उडत होती. विशेषत: बसेसना वळण घेताना अडचण येत होती. या वळणावर बस वळताना अडकत होत्या. या रस्त्यावर सकाळी आणि संध्याकाळी कोंडी झाल्याचे पहायला मिळाले. मात्र, प्रभात रस्त्यावरील नेहमी होणारी वाहतूक कोंडी आज मात्र पहायला मिळाली नाही. कॅनॉल रस्त्याने पुढे गेल्यानंतर डाव्या हाताला वळून नळ स्टॉपकडे गेलेल्या वाहनांना चौकात जातानाही कोंडीचा सामना करावा लागत होता. पौड रस्त्यावरील वाहतुकीच्या बदलाचा सर्वाधिक परिणाम पहायला मिळाला. पौड रस्त्यालगत असलेल्या कर्वे रस्ता आणि उपरस्त्यांवरही या बदलाचा चांगलाच परिणाम झालेला पहायला मिळाला. कर्वे पुतळा ते करिश्मा सोसायटी चौकापर्यंत रांगा लागल्या होत्या. तर कर्वे पुतळ्यापासून एसएनडीटीकडे येण्यासाठी जवळपास अर्धा तास लागत होता. कृष्णा हॉस्पिटलपासून एसएनडीटी पर्यंतही तशीच अवस्था होती.
लॉ कॉलेज रस्त्यावरील गल्ल्यांमध्ये राहणा-या नागरिकांनीही या बदलाबाबत नाराजी व्यक्त केली. सकाळी या बदलानुसार वाहतूक वळविण्यास सुरुवात झाल्यानंतर सुरु झालेली कोंडी दिवसभर पहायला मिळाली. यादरम्यान अनेक वाहनचालकांचे आणि नागरिकांचे पोलिसांशी वाद होत होते. स्थानिक नागरिकांना कोणत्याही प्रकारे विश्वासात घेण्यात आले नसल्याचेही अनेकांनी सांगितले.

Web Title: Manastapacha was the first day of passenger traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.