भिगवण बाजारपेठेत बोलबच्चनचा वर्कशॉप मालकाच्या चाळीस हजारांवर डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 13:24 IST2017-12-29T13:20:19+5:302017-12-29T13:24:13+5:30
भिगवण बाजारपेठेत भरदिवसा बोलण्यात गुंतवत व्हाइटकॉलर बुलेट राजाने वर्कशॉप मालकाच्या खिशातील चाळीस हजार रुपयांवर डल्ला मारला.

भिगवण बाजारपेठेत बोलबच्चनचा वर्कशॉप मालकाच्या चाळीस हजारांवर डल्ला
भिगवण : भिगवण बाजारपेठेत भरदिवसा बोलण्यात गुंतवत व्हाइटकॉलर बुलेट राजाने वर्कशॉप मालकाच्या खिशातील चाळीस हजार रुपयांवर डल्ला मारला. ही घटना दुपारच्या सुमारास घडली. बुलेटगाडी आणि खादी कपडे घालून सोन्याच्या अंगठी घालत सावजाला लुटणाऱ्या मुन्नाभाईला शोधण्याचे आव्हान भिगवण पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
भिगवण येथे मोटार रिवायडिंग व्यवसाय करणारे व्यावसायिक पंडित विठ्ठल गाडेकर (वय ३४) आपले मावसभाऊ राजकुमार वाघ यांच्याशी मुख्य बाजार पेठेत बोलत थांबले होते. एक मजबूत बांध्याच्या बुलेटस्वाराने त्यांना भिगवण येथे महा-ई सेवा केंद्र कोठे आहे, असा पत्ता विचारला. या वेळी बुलेटवरील पाठीमागे बसलेला इसमाने दारू प्यायल्याचे नाटक करीत पंडित यांना मिठी मारण्याचा प्रयत्न केला. पंडित यांनी त्याला पाठीमागे ढकलले असता त्यांच्या पायाशी हात नेत चुकल्याचे सांगून गाडीवर बसून पोबारा केला. याच वेळी पंडित यांना आपल्या खिशातील चाळीस हजार नसल्याचे लक्षात आले. अंगाशी झटत असताना त्या व्यक्तीने पैसे काढल्याची जाणीव होताच गाडेकर यांनी आपल्या मित्रांना याची माहिती देत या चोरट्याचा शोध घेतला. परंतु काही वेळातच या चोरट्यांनी पोबारा केला.