गटा-तटातील वर्चस्वातून माळेगाव झाले अशांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:08 IST2021-06-03T04:08:41+5:302021-06-03T04:08:41+5:30

राष्ट्रवादीचे रविराज तावरे यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर, जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. खरे तर राजकीय दृष्टिकोनातून माळेगाव हे सातत्याने राजकीय ...

Malegaon became turbulent due to the dominance of groups | गटा-तटातील वर्चस्वातून माळेगाव झाले अशांत

गटा-तटातील वर्चस्वातून माळेगाव झाले अशांत

राष्ट्रवादीचे रविराज तावरे यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर, जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. खरे तर राजकीय दृष्टिकोनातून माळेगाव हे सातत्याने राजकीय पटलावर चर्चेत असणारे हे गाव आहे. खासदार शरद पवार यांची यशस्वी राजकीय कारकीर्द याच गावातील धुरंधरांनी घडवली आहे. पवार यांचे निवासस्थान याच गावात आहे.तसेच खासदार सुप्रिया सुळे व विशेषत: उपमुख्यमंत्री पवार यांचा शब्द मानणारे गाव अशी ओळख आहे.

पूर्वी गावात राजकीय गट-तट होते. त्यांच्यात वादविवाद होत होता. अपवादाने मारामारी देखील झाली. पण शस्राचा वापर कधीच झाला नाही. त्यांचे वाद शब्दावर मिटायचे व गावात शांतता नांदायची. मात्र, सन २०१७ ला झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीपासून गटातटातील वादाला अधिक जोर आला.दोन गट एकमेकांना पाण्यात पाहू लागले.त्यामुळे गटाचे राजकारणात अधिक व्यापक होऊ लागले.वादविवाद वाढत गेले.

दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीस वर्ष होताच सोशल मीडियाचा वादासाठी वापर होऊ लागला. एक गट सोशल मीडियावर जाहिरातबाजी करण्यात मग्न होता. तर दुसरा गट त्या विरोधी संदेश प्रसारित करत होता.एखाद्या राजकीय कार्यक्रमात अथवा ग्रामसभेत खडाजंगी होऊ लागली. गेल्या तीन-चार महिन्यांत गावातील विकासकामे उद्घाटन, कोविड सेंटर, वाढदिवसाचे आक्षेपार्ह फ्लेक्स यावरून मोठा वादंग झाला होता.एका गटाची भांडणे झाली, तर दुसरा गट ते भांडण कसे वाढेल, याकडे लक्ष देत होता. यामधून वैयक्तिक खुन्नस वाढत गेली. यातून काही समर्थकांना मार खावा लागला होता. हा वाद थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दरबारात गेला होता. आगामी काळात नगरपंचायत निवडणूक होणार आहे.या काळात गटातटातील वाद आणखी उफाळून येणार आहे.

Web Title: Malegaon became turbulent due to the dominance of groups