पैैशाच्या आमिषाने बलात्काराचा बनाव
By Admin | Updated: June 20, 2017 06:51 IST2017-06-20T06:51:06+5:302017-06-20T06:51:06+5:30
उरुळी कांचन-जेजुरी मार्गावर शिंदवणे (ता. हवेली) घाटात शुक्रवारी रात्री एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना बनावट असून

पैैशाच्या आमिषाने बलात्काराचा बनाव
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणी काळभोर : उरुळी कांचन-जेजुरी मार्गावर शिंदवणे (ता. हवेली) घाटात शुक्रवारी रात्री एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना बनावट असून, नारायणगव्हाण (ता. पारनेर, जि. नगर) परिसरातील दोघांनी पूर्ववैमनस्यातून आपल्या शत्रूंना तुरुंगात पाठविण्यासाठी महिला व इतरांना हाताशी धरून बलात्काराचा कट रचल्याचे तपासात उघड झाले आहे. बलात्कार झालाच नसून केवळ पैशाच्या आशेने आपण यांत सहभागी झाले असल्याची कबुली महिलेने दिली आहे. अपर पोलीस अधीक्षक संदीप पखाले यांनी ही माहिती दिली. वैयक्तिक भांडणातून दोन तरुणांवर बलात्काराचा खोटा आरोप करून, त्यांना तुरुंगात पाठविण्याचा कट लोणी काळभोर पोलिसांनी उधळून लावला. या तपासकामाबद्दल ग्रामीण पोलीस कौतुकास पात्र आहेत.
उरुळी कांचन-जेजुरी मार्गावर शिंदवणे (ता. हवेली) घाटात शुक्रवारी रात्री एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार एका महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात नोंदविली होती. नारायणपूर (ता. पुरंदर) येथे देवदर्शन करून
परत घरी जाताना हा प्रकार शिंदवणे घाटात घडला.
कटाची महिनाभर आधीपासून तयारी
या दोन गटांतील तरुणांचा काही वर्षांपासून वाद आहे. आठ दिवसांपूर्वी त्यांनी त्या दोघांना लवकरच खडी फोडायला पाठवणार असल्याची धमकीही दिली होती. कट रचणाऱ्यांनी संबंधित महिलेला व बनावट साक्षीदार तरुणांना मोटारीतून शिंदवणे घाटात फिरवून आदल्या दिवशी प्रात्यक्षिक (रेकी) करून घेतले होते. विश्रांतवाडी-येरवडा परिसरातून दोन तरुणांना पैशाचे आमिष दाखवून कटात सहभागी करून घेतले. हा कट अमलात आणण्यासाठी जवळजवळ महिनाभर आधीपासून तयारी सुरू होती. या कटात एका महिलेसह एकूण सात जणांचा सहभाग पोलीस तपासात उघड झाला आहे.