अशक्य गोष्ट शक्य करून दाखवा
By Admin | Updated: October 9, 2016 05:04 IST2016-10-09T05:04:33+5:302016-10-09T05:04:33+5:30
तुम्ही असे काही करून दाखवा, की ज्यामुळे दुसऱ्यांना तुमची समीक्षा करता येऊ नये. यश मिळविण्याविषयीच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या असू शकतात.

अशक्य गोष्ट शक्य करून दाखवा
पुणे : तुम्ही असे काही करून दाखवा, की ज्यामुळे दुसऱ्यांना तुमची समीक्षा करता येऊ नये. यश मिळविण्याविषयीच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या असू शकतात. मात्र, दुसऱ्यांना अशक्य वाटेल अशी गोष्ट शक्य करून दाखविणे आणि त्याची लोकांनी नोंद घेणे, यालाच यश म्हणता येईल, असे मत प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी व्यक्त केले. तसेच, यशस्वी होण्यासाठी कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात, याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले.
लोकमत नॉलेज फोरम, साई बालाजी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने आणि केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल, सिंहगड इन्स्टिट्यूट, सूर्यदत्ता, रिलांयन्स जिओ हे डिजिटल पार्टनर होते़
चाटे शिक्षण समूह, पुणे इंटरनॅशनल स्कूल, टिंगरेनगर या शिक्षणसंस्थांच्या सहकार्याने आयोजित कार्यक्रमात चेतन भगत बोलत होते. विद्यार्थ्यांनी चेतन भगत यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधला. तसेच, भगत यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. कार्यक्रमाला साईबालाजी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्सचे मनीष मुंदडा, रिलायन्स जिओचे मार्केटिंग हेड निखिल मेहरा, लोकमतचे महाव्यवस्थापक मिलन दर्डा, निनाद देसाई, लोकमतच्या पुणे आवृत्तीचे संपादक विजय बाविस्कर आदी उपस्थित होते.
कठोर परिश्रम, कामावरील निष्ठा असल्याशिवाय कोणतीही गोष्ट शक्य नाही. प्रत्येकाने आव्हानांना सामोरे जात यशाकडे वाटचाल करावी. हिंदीमध्ये ‘औकात’ असा शब्द विशेष अर्थाने वापरतात, असे नमूद करून भगत म्हणाले, ‘‘अपनी औकात से जादा कर दिखानाही सक्सेस है। जीवनात यशस्वी होण्यासाठी तुम्ही आपल्या आवडीच्या क्षेत्रात झोकून देऊन (पॅशिनेटली) काम करावे. त्यासाठी ध्येय निश्चित करणे आवश्यक आहे. तसेच, संबंधित ध्येय का निश्चित करता, त्यामागे ठोस कारण असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांकडे ध्येयापर्यंत पोहोचण्याचा कृतिकार्यक्रम असायला हवा. कोणतेही ध्येय पूर्ण करताना अनेक अडचणी येतील; मात्र त्यांना सामोरे जाण्याची क्षमता तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. जीवनात नियमितपणे केलेल्या गोष्टींना यश म्हणता येणार नाही.’’
जेव्हा तुम्ही क्षमतेपलीकडे जाऊन काम करून दाखविले आणि लोकांनी त्याची नोंद घेतली, त्याला यश म्हणाता येईल. अपयश आले म्हणून मागे न जाता पुन्हा सावरून उभे राहण्यास शिकले पाहिजे. तणावाखाली न राहता बाहेर येण्याचा प्रयत्न करावा, असेही भगत यांनी सांगितले. विजय बाविस्कर यांनी आभार मानले. अजिंक्य देशमुख व लिना सलढाना यांनी सुत्रसंचलन केले.(प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांच्या यशाच्या व्याख्या...
‘तुमची स्वाक्षरी जेव्हा आॅटोग्राफ’ बनते त्याला यश म्हणता येईल, ध्येयपूर्तीनंतरच्या समाधानाला यश म्हणावे, आनंदाचा पाठलाग करणे म्हणजे यश, स्वप्नांचा पाठलाग म्हणजे यश, पैसा आणि ताकद मिळविणे म्हणजे यश अशा यशाच्या व्याख्या विद्यार्थ्यांनी चेतन भगत यांना सांगितल्या.
विद्यार्थ्यांना दिल्या टिप्स...
कामात अधिकाधिक नावीन्य, स्वत:च स्वत:ला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता, संयम, सहकाऱ्यांची मदत घेऊन तुम्हाला यशस्वी होता येऊ शकते, अशा टिप्स चेतन भगत यांनी दिल्या. तसेच, स्वभावातील उद्धटपणा बाजूला ठेवून यशप्राप्तीकडे वाटचाल करायला हवी, असेही चेतन भगत यांनी सांगितले.