संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:10 IST2021-05-15T04:10:12+5:302021-05-15T04:10:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुले बाधित होण्याची शक्यता गृहीत धरून राज्य शासन व ...

संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करा
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुले बाधित होण्याची शक्यता गृहीत धरून राज्य शासन व प्रशासनाच्या वतीने आरोग्य सुविधा आणखी सक्षम करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. यादृष्टीने पुणे जिल्ह्यात देखील उपाययोजना करव्यात, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी येथे दिल्या.
पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार गिरीश बापट, वंदना चव्हाण, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार दिलीप मोहिते, अशोक पवार, सुनील टिंगरे, सुनील शेळके, चेतन तुपे, राहुल कुल, भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम, भूजल सर्वेक्षण विभागाचे संचालक मल्लिनाथ कलशेट्टी, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पुणे जिल्ह्यातील कोरोना विषाणूची सद्यस्थिती, प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना तसेच लसीकरण आदी विषयांबाबत अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली.
लहान मुलांसाठी स्वतंत्र खाटा राखीव ठेवा
पवार म्हणाले, ‘कोरोना’च्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान बालके बाधित झाल्यास त्यांना आवश्यक ते उपचार वेळेत उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने नियोजन करण्यात येत आहे. बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करण्यात येत आहे. याद्वारे लहान मुलांवरील उपचाराबाबत मार्गदर्शन, प्रतिबंधात्मक औषधे, आवश्यक साधनसामग्री व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याबाबत तयारी करण्यात येत आहे. जिल्ह्यात ससून रुग्णालय, यशवंतराव चव्हाण रुग्णालय, नायडू रुग्णालय या रुग्णालयांसह जिल्ह्यातील भारती हॉस्पिटल, सिम्बायोसिस हॉस्पिटल, रुबी हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अशा खाजगी रुग्णालयांनी देखील रुग्णालयात लहान मुलांसाठी स्वतंत्र खाटा राखीव ठेवण्याबाबत कार्यवाही करावी.