उत्कृष्ट सूचना करा; २५ हजार मिळवा

By Admin | Updated: July 14, 2015 04:06 IST2015-07-14T03:11:17+5:302015-07-14T04:06:48+5:30

देशातील स्मार्ट सिटी म्हणून विकसित करावयाच्या शहरांमध्ये पुण्याचा समावेश होणार, हे जवळजवळ निश्चित आहे. हे स्मार्ट शहर नेमकं कसं असावं, त्यामध्ये कशास प्राधान्य

Make excellent suggestions; Get 25 thousand | उत्कृष्ट सूचना करा; २५ हजार मिळवा

उत्कृष्ट सूचना करा; २५ हजार मिळवा

पुणे : देशातील स्मार्ट सिटी म्हणून विकसित करावयाच्या शहरांमध्ये पुण्याचा समावेश होणार, हे जवळजवळ निश्चित आहे. हे स्मार्ट शहर नेमकं कसं असावं, त्यामध्ये कशास प्राधान्य देण्यात यावे, कशाचा अवलंब करावा याबाबतच्या सूचना २५० शब्दांमध्ये २० जुलैपर्यंत महापालिकेकडे करता येणार आहेत. उत्कृष्ट सूचना करणाऱ्यांना महापालिकेकडून २५ हजार, १५ हजार, १० हजार रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. तसेच योजनेमध्येही यांचा समावेश केला जाईल, अशी घोषणा महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी सोमवारी केली. या वेळी आयुक्त कुणाल कुमार उपस्थित होते.
स्मार्ट सिटीच्या महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये नागरिकांचा सहभाग असावा याकरिता ‘माझं स्वप्न, स्मार्ट पुणे’ ही योजना जाहीर करण्यात आली आहे. ‘स्मार्ट सिटी डॉट पुणे कार्पोरेशन डॉट ओआरजी’ किंवा ‘पुणे स्मार्ट सिटी डॉट इन’ या संकेतस्थळावर आॅनलाइन पद्धतीने मत नोंदविता येणार आहे. तसेच महापालिकेच्या फेसबुक पेजवर देखील याची लिंक उपलब्ध आहे. ज्या नागरिकांना आॅनलाइन सूचना पाठविता येणार नाहीत, त्यांना लेखी मत महापालिकेचे उपायुक्त (विशेष), दुसरा मजला यांच्याकडे २० जुलैपर्यंत पाठविता येईल.
शहराच्या विकासाकरिता काय केले पाहिजे, कोणते नियोजन असले पाहिजे, समस्यांच्या सोडवणुकीसाठी काय उपाय केले पाहिजेत, याबाबतच्या सूचना करणे अपेक्षित आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट सूचना पाठविणाऱ्यांना १५ आॅगस्टला महापौर व आयुक्तांच्या हस्ते पारितोषिक देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

निवडीसाठीचे निकष
स्मार्ट सिटी स्पर्धेकरिता पाठविलेल्या सूचनांमधून उत्कृष्ट सूचनांची निवड करण्याकरिता एक समिती नेमली आहे. सूचनांमधील वास्तवता (२५ टक्के), स्पष्टता (२५ टक्के), कल्पकता (२५ टक्के) , परिणामकारकता/उपयुक्तता (२५ टक्के) या आधारांवर मूल्यमापन केले जाणार आहे. उत्कृष्ट सूचना पाठविणाऱ्यांचा महापालिकेकडून गौरव करण्याबरोबरच स्मार्ट सिटी योजनेमध्ये त्याचा समावेशही करण्यात येणार असल्याचे कुणाल कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

तुम्हीच ठरवा प्राधान्यक्रम
महापालिकेच्या वतीने १० विषयांची यादी देण्यात आली आहे. त्यातील कोणत्या विषयास सर्वाधिक प्राधान्य द्यावे याबाबत पुणेकरांना मत नोंदविता येणार आहे. परवडणारी घरे, आरोग्य, शिक्षण, घनकचरा, विद्युत व्यवस्था, नागरिकांचा सहभाग, पर्यावरण, सार्वजनिक स्वच्छतागृहे, सार्वजनिक वाहतूक, पाणीपुरवठा यातून प्राधान्यक्रम निवडायचा आहे. १३ जुलैला रात्री बारा वाजल्यापासून २० जुलैच्या रात्री बारापर्यंत सूचना पाठविता येणार आहेत.

Web Title: Make excellent suggestions; Get 25 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.