कोरोनाबाधितांना खाटा उपलब्ध करून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:11 IST2021-03-27T04:11:01+5:302021-03-27T04:11:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात दिवसाला साडेतीन हजारांच्या आसपास वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या व तीस हजारांवर पोहोचलेल्या सक्रिय रूग्णसंख्येमुळे ...

Make the bed available to the coronadians | कोरोनाबाधितांना खाटा उपलब्ध करून द्या

कोरोनाबाधितांना खाटा उपलब्ध करून द्या

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरात दिवसाला साडेतीन हजारांच्या आसपास वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या व तीस हजारांवर पोहोचलेल्या सक्रिय रूग्णसंख्येमुळे महापालिकेने, शहरातील ८६ खाजगी रूग्णालयांना (बेडसंख्या ५० च्या पुढे असलेल्या) जास्तीत जास्त बेड कोरोनाबाधितांना उपलब्ध करून देण्याबाबतचे आदेश दिले आहेत़

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव जास्त असला तरी, गंभीर रूग्णसंख्या कमी आहे़ परंतु, आजमितीला दररोज नव्याने वाढणाऱ्या सुमारे साडेतीन हजार रूग्णांपैकी दहा टक्के रूग्णांना तरी आॅक्सिजनची गरज भासत आहे़ यामुळे महापालिकेने विभागीय आयुक्त कार्यालयाच्या डॅशबोर्ड असलेल्या शहरातील खाजगी रूग्णांलयांमधील ५० टक्के बेड (खाटा) कोरोनाबाधितांसाठी राखीव ठेवण्याचे आदेशच आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत बजाविले आहेत़

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, डॅशबोर्डवर नोंद असलेल्या खाजगी रूग्णालयांमध्ये ७ हजार ६७० बेडची क्षमता आहे़ यापैकी सध्या डॅशबोर्डवरील नोंदीनुसार कोरोनाबाधितांसाठी या रूग्णालयांनी ३ हजार २३० बेड स्वत:हून उपलब्ध करून दिले आहेत़ कोरोनाच्या पहिल्या लाटेत म्हणजे आॅगस्ट, सप्टेंबर, २०२० मध्ये ही संख्या ३ हजार ६४६ इतकी होती़

पालकमंत्री अजित पवार यांच्या बैठकीनंतर महापालिकेने शहरातील खाजगी रूग्णालयांना ५० टक्के बेड राखीव करण्याचे आदेश दिले आहेत़ यामुळे कोरोनाबाधितांसाठी सध्या खाजगी रूग्णांमधील राखीव खाटांमध्ये आणखी साधारणत: ६०० खाटांनी वाढ होणार आहे़ विशेषत: यामध्ये आॅक्सिजनसुविधा असलेल्या खाटांचा अधिक समावेश राहणार असल्याचेही आरोग्य विभागाने सांगितले़

--------------------------

जम्बो कोविड रूग्णालयाची क्षमताही वाढविणार

शिवाजीनगर येथील जम्बो कोविड रूग्णालयात आजमितीला २५० बेड क्षमता उपलब्ध आहे़ ती येत्या दोन दिवसांत ५०० पर्यंत नेण्यासाठी महापालिकेने संबंधित कंपनीला आदेश दिले आहेत़ यामुळे येथील आॅक्सिजन बेडची क्षमता २५० पर्यंत व्हेटिंलेटर बेडची क्षमता ५० व सर्वसाधारण बेडची क्षमता २०० पर्यंत पोहचणार आहे़

------------------------------------------

खाजगी रूग्णालयांनी स्वत:हून बेड उपलब्ध करून द्यावेत : महापौर

शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी बहुतांशी रूग्ण हे होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारत आहे़ परंतु, वाढत्या रूग्ण संख्येत अनेक रूग्णांना आॅक्सिजन बेडची आवश्यकता लागत आहे़ यामुळे शहरातील खाजगी रूग्णालयांनी स्वत:हून अधिकाधिक बेड कोरोनाबाधितांसाठी उपलब्ध करून द्यावेत, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे़

------------------------------------

Web Title: Make the bed available to the coronadians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.