पुणे : राज्य वीज नियामक आयोगाच्या नियमावलीनुसार ग्राहकांना किती तांत्रिक बिघाडांना सामोरे जावे लागले व त्यामुळे किती काळ अंधारात बसावे लागले, याची माहिती अर्थात विश्वासार्हतेचे निर्देशांक ‘महावितरण’ने दरमहा प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. मात्र, महावितरणने गेल्या पाच महिन्यांपासून हे निर्देशांक प्रसिद्ध केलेले नाहीत.
त्यामुळे आयोगाच्या नियमांना हरताळ फासत वीज किती वेळा खंडित झाली याची माहिती दडविण्यात आली आहे. जुलैत राज्यात वीज खंडित होण्याच्या २३ हजार ७६९ तर पुणे विभागात १ हजार ३१४ घटना घडल्या आहेत. त्यामुळे राज्यातील जवळपास चार कोटी ग्राहकांना जवळपास ३५ हजार तास तर पुणे विभागातील ३६ लाख ग्राहकांना २ हजार ५१ तास अंधारात बसावे लागले.
याबाबत सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी यापूर्वी आयोगाकडे तक्रार केल्यानंतर महावितरणने निर्देशांक प्रसिद्ध केले होते. ‘महावितरण’ने स्वतः ही माहिती प्रसिद्ध करणे अपेक्षित असताना आयोगाकडे तक्रार केल्यानंतर माहिती प्रसिद्ध केली जाते, असा आरोप वेलणकर यांनी केला आहे. तक्रार केल्यानंतर काही तासांत तीन तीन महिन्यांची माहिती प्रसिद्ध होते. याचाच अर्थ ती तयार असते पण त्यातून महावितरणच्या कारभाराचे चित्र स्पष्ट होत असल्याने ती माहिती प्रसिद्ध करण्याचे टाळले जाते, असेही वेलणकर यांनी स्पष्ट केले.
वेलणकर यांच्या यापूर्वीच्या तक्रारीनंतर ‘महावितरण’च्या संकेतस्थळावर जुलैची माहिती प्रसिद्ध करण्यात आली असून त्यानुसार या महिन्यात राज्यात वीज खंडित होण्याच्या २३ हजार ७६९ घटना घडल्या. त्यामुळे राज्यातील सुमारे ४ कोटी ग्राहकांना जवळपास ३५ हजार तास अंधारात बसावे लागले. देशातील पहिली स्मार्ट सिटी म्हणवणाऱ्या पुणे विभागातील परिस्थिती सुद्धा वाईटच आहे. जुलैत पुणे विभागात वीज खंडित होण्याच्या १ हजार ३१४ घटना घडल्या, ज्यामध्ये पुण्यातील जवळपास ३६ लाख ग्राहकांना २ हजार ५१ तास अंधारात बसावे लागले.
राज्य
महिना घटना तास ग्राहक
जानेवारी १३००१--२३४३४--२.२५ कोटी
फेब्रुवारी १२१४४--२१८०१--२ कोटी
मार्च १६४४२--२८०७६--३ कोटी
एप्रिल १६६३४--३०००८--२ कोटी ६८ लाख
मे १८५४१--३६७१४--२ कोटी ९६ लाख
जून २१८६२--३९९१४--३ कोटी ६७ लाख
जुलै २३७६९--३४९९३--३ कोटी ९८
पुणे
महिना घटना तास ग्राहक
जानेवारी ६८७--१४९६--२२ लाख
फेब्रुवारी ६३३--१९२९--२१ लाख
मार्च ८९१--२४७२--३१ लाख
एप्रिल ६०७--११६९--१८ लाख ६० हजार
मे ७६३--१४९०--२१ लाख २१ हजार
जून ८९४--१५८६--२८ लाख २३ हजार
जुलै १३१४--२०५१--३८ लाख ६७ हजार
महावितरणच्या संकेतस्थळावर गेल्या ६ वर्षांच्या निर्देशकांची माहिती उपलब्ध आहे. ते पाहता तांत्रिक बिघाडामुळे होणारा अंधार राज्याच्या पाचवीलाच पुजलेला असल्याचे स्पष्ट दिसून येते. या व्यतिरिक्त देखभाल दुरुस्तीसाठी आठवड्यातून एक दिवस (पुण्यात गुरुवारी) काही तासांचा नियोजनबद्ध अंधार आणि ग्रामीण भागातील भारनियमनामुळे होणारा अंधार वेगळाच. महावितरणला नियमाप्रमाणे दरमहा हे निर्देशांक प्रसिद्ध करण्यास भाग पाडावे आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे या निर्देशांकातून समोर येणाऱ्या ढिसाळ कारभारात सुधारणा होण्यासाठी पावले उचलण्यासाठी ‘महावितरण’ला बाध्य करावे. - विवेक वेलणकर, अध्यक्ष सजग नागरिक मंच, पुणे