महाराष्ट्राची पहिली हेलिकॉप्टरचालक
By Admin | Updated: March 8, 2015 01:12 IST2015-03-08T01:12:57+5:302015-03-08T01:12:57+5:30
मोठी झाली की वैमानिक बनणार व एक दिवस घरावरून विमान नेणार... असे धाडसी स्वप्न पाहत वडगावशेरी येथील अरूणिमा विधाते हिने ते पूर्ण केले

महाराष्ट्राची पहिली हेलिकॉप्टरचालक
बेनझीर जमादार ल्ल पुणे
प्रत्येक व्यक्तीचे काही ना काही स्वप्न असते. जसे की, मोठी झाली की वैमानिक बनणार व एक दिवस घरावरून विमान नेणार... असे धाडसी स्वप्न पाहत वडगावशेरी येथील अरूणिमा विधाते हिने ते पूर्ण केले आणि महाराष्ट्राची पहिली हेलिकॉप्टरचालक बनण्याचा मान २००६ मध्ये मिळविला. हवाई दल हे एक असे क्षेत्र आहे, की दलाच्या सेवेसाठी फायटर, मालवाहू व हेलिकॉप्टर असे तीन पर्याय असतात. परंतु पुरूषांचे वर्चस्व असलेल्या या क्षेत्रात फ्लाइंगसाठी ११९४ पासून महिलांची भरती करण्यास सुरूवात झाली. या क्षेत्रात १९९४ ते २००५ या वर्षी राज्यातून एकाही महिलेची निवड झाली नाही. २००६ मध्ये हवाई दलाच्या क्षेत्रात देशभरातून विविध विभागातून केवळ १६ महिलांची निवड झाली. यापैकी महाराष्ट्रातून ही धाडसी कन्या हवाई दलात सहभागी झाली. २०१० मध्ये दिल्ली या ठिकाणी फ्लाइंग करीत असताना तिच्या हेलिकॉप्टरने अचानक पेट घेतला असताना ही तिने न घाबरता कोणतेही नुकसान न करता यशस्वीरीत्या हेलिकॉप्टर लँड केले, याबद्दल शासनातर्फे तिला चीफ आॅफ एअर कॉमन्डेंशन हे पदक मिळाले. तसेच २०११ मध्ये सिक्कीम येथील झालेल्या भूकंपात डोंगराळ भागातील सर्व रस्ते बंद असताना अन्न, पाणी व औषध पोहोचविण्याचे काम तिने हेलिकॉप्टरच्या माध्यमातून केले.
मध्यमवर्गीय परिस्थितीतून वाढलेल्या अरूणिमाची दहावी मराठी माध्यमातूनच पूर्ण झाली. पुढे वाडिया महाविद्यालयातून शिक्षण चालू असतानाच एनसीसीमध्ये सहभागी झाली. या मार्गाने दिल्ली परेडला निवड झाली व हाच क्षण तिच्या करिअरसाठी टर्निंग पॉईट ठरला. सध्या ती स्कॉड्रन लिडर या पदावर असून चेतक व चिता हे हेलिकॉप्टर चालविते. नुकतेच तिने जंगल अॅन्ड स्नो सर्व्हायल ट्रेनिंग पूर्ण केले.
मुले करिअर करू पाहत असेल तर पालकांनी मुलांना लोक काय म्हणतील याचा विचार न करता त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. कुटुंबाचा पाठिंबा हा सर्वात महत्त्वाचा असतो. - सुनंदा विधाते
(अरूणिमा यांची आई)
स्वत:वर विश्वास ठेवून ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करा व देशासाठी काहीतरी कामगिरी करून दाखवा. - अरूणिमा विधाते
ओबामांसमोर संचलन
प्रजासत्ताकदिनाच्या दिवशी प्रमुख अतिथी असलेल्या ओबामा यांच्यासमोर राजपथावर नारीशक्ती दाखविताना हवाई दलाच्या ताफ्यातून अरूणिमाने संचलन केले. राजपथावर संचलन करण्याची तिची तिसरी वेळ होती.