Maharashtra Election 2019 ब्राह्मण महासंघाचा कोणालाही पाठिंबा नाही : डॉ. गोविंद कुलकर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 16:38 IST2019-10-06T16:33:32+5:302019-10-06T16:38:47+5:30
काेथरुडमध्ये काेणत्याही उमेदवाराला पाठींबा दिला नसल्याचे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने स्पष्ट केले आहे.

Maharashtra Election 2019 ब्राह्मण महासंघाचा कोणालाही पाठिंबा नाही : डॉ. गोविंद कुलकर्णी
पुणे : कोथरूड विधानसभा मतदार संघातील भाजप-सेना महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील याच्यासह, कोणत्याही उमेदवाराला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने पाठिंबा दिलेला नाही़ असे स्पष्टीकरण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.ग़ोविंद कुलकर्णी यांनी दिले आहे.
याबाबत महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष अव्दैत देहाडराय यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे माहिती दिली आहे. दरम्यान चुकीची माहिती दिल्याप्रकरणी प्रवक्ते आनंद दवे यांना महसंघाने निलंबित केल्याचे याव्दारे जाहिर करण्यात आले आहे. तसेच चंद्रकांत पाटील यांना दवे यांनी दिलेल्या पाठिंबा पत्राचा व महासंघाचाही काहीही संबंध नसल्याचेही डाॅ.कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे महासंघाचे कोथरूडमधील उमदेवार मयुरेश अरगडे यांनीही दवे यांनी दिलेल्या पाठिंबा पत्राशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगून, महासंघाचे पदाधिकारी जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचे सांगितले आहे. तसेच दवे यांच्या निलबंनामुळे महासंघाला काहीही फरक पडणार नसल्याचेही ते म्हणाले.
महासंघाने रविवारी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात, शनिवार दि़ ५ ऑक्टोबर रोजी चंद्रकांत पाटील यांच्या आग्रहामुळेच, महासंघाचे अध्यक्ष डॉ. ग़ोविंद कुलकर्णी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मोहिनी पत्की व अन्य पदाधिकारी गेले होते असे सांगण्यात आले आहे. या भेटी दरम्यान महासंघाचे पदाधिकारी व चंद्रकांत पाटील यांच्यात ब्राह्मण समाजाच्या मागण्या संदर्भात चर्चा झाली होती. मात्र चर्चा समाधानकारक न झाल्याने डाॅ. क़ुलकर्णी यांनी आपले परखड मत व्यक्त करून तेथून निघून गेले, असे असताना प्रवक्ते दवे यांनी पूर्वनियोजित मजकूरावर उपस्थित पदाधिकाऱ्यांची दिशाभूल करून सह्या घेतल्या आहेत. दवे यांच्या या बेजाबदार कृत्यामुळे त्यांना महासंघाने निलंबित केल्याचेही सांगण्यात आले आहे.