पुणे: कोणत्याही व कसल्याही राजकीय घटना घडामोडींमध्ये मी नि:संशयपणे शरद पवार यांच्यासोबतच असेल अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांनी दिली. आत्ता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तसेच लोकप्रतिनिधींमध्येही संभ्रम आहे, मात्र लवकरच त्यात स्पष्टता येईल असे त्या म्हणाल्या.लोकमत बरोबर बोलताना चव्हाण म्हणाल्या, अजित पवार यांनी अशी भूमिका का घेतली याविषयी आत्ता काहीही सांगता येणे शक्य नाही. पक्षाचे लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला हे स्पष्ट दिसते आहे, मात्र तो फार दिवस राहणार नाही. शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे लवकरच पक्षाचे लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांमध्येही स्पष्टता येईल. संंभ्रम फार दिवस राहणार नाही. मी स्वत: तर कायम शरद पवार यांच्याबरोबरच राहणार आहे, त्यामुळे माझ्या मनात कसलाही संभ्रम नाही.भाजपाला पाठिंबा देण्याची अजित पवार यांची भूमिका वैयक्तिक आहे असे शरद पवार यांनी जाहीरपणे सांगितले आहे. ते स्वत:ही त्यामुळे चकित झाले असल्याची माहिती मला काही लोकप्रतिनिधींबरोबर बोलताना मिळाली. असे होईल याची कोणालाही कल्पना नव्हती. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होणे स्वाभाविक आहे, मात्र शरद पवार अशा स्थितीतही शांतपणे विचार करून निर्णय घेतात. कार्यकर्त्यांच्या त्यांच्यावर विश्वास आहे. राजकारणात काहीही होऊ शकते हेच अजित पवार यांच्या निर्णयामुळे सिद्ध होते असे खासदार चव्हाण म्हणाल्या.शरद पवार यांनी पक्षासाठी राज्यात चांगले वातावरण तयार केले. विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रचारात त्यांनी दाखवलेली सक्रियता राज्याने पाहिली, देशाने त्याचे कौतूक केले. मतदारांनीही त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. सत्ता स्थापन करण्याइतके बहुमत कोणत्याही एका पक्षाला मिळाले नाही, युतीमध्ये मतभेद निर्माण झाले, त्यानंतरही शरद पवार ज्यांच्याजवळ बहुमत आहे त्यांनीच, म्हणजे युतीने सत्ता स्थापन करावी असेच म्हणत होते. तरीही काही होत नाही हे लक्षात आल्यानंतर ते सक्रिय झाले. त्यातून त्यांनी काही समीकरणे तयार केली. ती पुर्ण होत असतानाच अजित पवार यांचा असा वेगळा निर्णय झाला आहे. त्यावर पक्षप्रमुख म्हणून आता शरद पवारच काय तो निर्णय घेतील असे खासदार चव्हाण यांनी स्पष्ट केले.
Maharashtra CM : कोणत्याही व कसल्याही राजकीय घटना घडामोडींमध्ये मी शरद पवारांसोबतच
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 15:39 IST
अजित पवार यांनी अशी भूमिका का घेतली याविषयी आत्ता काहीही सांगता येणे शक्य नाही
Maharashtra CM : कोणत्याही व कसल्याही राजकीय घटना घडामोडींमध्ये मी शरद पवारांसोबतच
ठळक मुद्देपक्षाचे लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला हे स्पष्ट