महाराष्ट्र-गुजरातमध्ये वाद नसावा : बाबासाहेब पुरंदरे; ‘सुरतवाला कुटुंबाची संघर्षगाथा’चे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 13:16 IST2017-12-25T13:10:07+5:302017-12-25T13:16:57+5:30
सुरतवाला फाउंडेशनतर्फे रसिक मित्र मंडळचे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवालालिखित ‘सुरतवाला कुटुंबाची संघर्षगाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते पत्रकार भवन येथे करण्यात आले.

महाराष्ट्र-गुजरातमध्ये वाद नसावा : बाबासाहेब पुरंदरे; ‘सुरतवाला कुटुंबाची संघर्षगाथा’चे प्रकाशन
पुणे : गुजरात व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात हितसंबंध जपले गेले पाहिजे. शिवाजी महाराजदेखील सुरत लुटायला गेले नव्हते. शाहिस्तेखानाने तीन वर्षांत जे काही पुण्याचे नुकसान केले त्याची भरपाई खंडणीरूपात वसूल करण्यासाठी महाराज सुरतला गेले होते. भूतकाळातील सर्व काही घटना विसरून गुजरात व महाराष्ट्र यांनी जिव्हाळ्याचे नाते जपले पाहिजे, त्यामध्ये कोणताही वाद अस्तित्वात नसावा, असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले.
सुरतवाला फाउंडेशनतर्फे रसिक मित्र मंडळचे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवालालिखित ‘सुरतवाला कुटुंबाची संघर्षगाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते पत्रकार भवन येथे करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी शांतिलाल सुरतवाला, नटवरलाल सुरतवाला, बळवंत जमनादास गांधी, जगमोहन रंगीलदास सुरतवाला, दिनेश सुरतवाला आदी उपस्थित होते. पुरंदरे म्हणाले, ‘‘वृद्धाश्रम ही आपली संस्कृती नाही, तर मातृदेवो व पितृदेवो भव ही आपली संस्कृती आहे.’’ शिवाजी महाराजांच्या सुरत स्वारीतील काही लक्षणीय प्रसंग बाबासाहेबांनी सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी सुरतवाला फाउंडेशनतर्फे शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
प्रदीप निफाडकर यांनी सूत्रसंचालन केले.