पुरंदर उपसा जलसिंचन योजनेसाठी महामोर्चा
By Admin | Updated: July 16, 2014 04:19 IST2014-07-16T04:19:31+5:302014-07-16T04:19:31+5:30
गुंजवणी धरणातील पुरंदरच्या हक्काचे २.०२ टीएमसी पाणी पुरंदर कृषी संजीवनी योजनेतून मिळावे, योजना मंजूर करण्याचे लेखी आश्वासन जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे यांनी लेखी द्यावे
पुरंदर उपसा जलसिंचन योजनेसाठी महामोर्चा
सासवड : गुंजवणी धरणातील पुरंदरच्या हक्काचे २.०२ टीएमसी पाणी पुरंदर कृषी संजीवनी योजनेतून मिळावे, योजना मंजूर करण्याचे लेखी आश्वासन जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे यांनी लेखी द्यावे. अन्यथा बेमुदत उपोषण सुरू करू, असा इशारा पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी सासवड येथे दिला.
सासवड येथील पालखी मैदानात जलदिंडीची सुरुवात करताना झालेल्या सभेत त्यांनी ही घोषणा केली. पुरंदरच्या पाणीप्रश्नावर पुण्यातील सिंचन भवनावर शिवसेनेच्या वतीने सासवड येथून जलदिंडी काढण्यात आली. गुंजवणी धरणाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. तेथील पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावला आहे. याचबरोबर पुरंदर तालुक्याला कालव्याद्वारे पाणी देणे शक्य नाही म्हणून शिवतारे यांनी गुंजवणी धरणातून बंद पाईपलाईनद्वारे पाणी योजना शासनाकडे सादर केली. या योजनेस २३ जुलै रोजी होणाऱ्या कृष्णा खोरे महामंडळाच्या बैठकीमध्ये प्रशासकीय मान्यता द्यावी, अशी मागणी शिवतारे यांनी केली. सुरुवातीला शिवसेना तालुकाप्रमुख दिलीप यादव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. हवेलीमधील शिवसेना नेते शंकरनाना हरपळे, रा. स. प.चे अध्यक्ष महादेव जानकर, उपाध्यक्ष दशरथ राऊत, हडपसरचे आमदार महादेव बाबर यांनी आंदोलनास पाठिंबा दिला. अतुल म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान, या जलदिंडीत शंभर बैलगाड्या, गाढव, मेंढरे यांसह हजारो शेतकरी सहभागी झाले होते.
(वार्ताहर)