राष्ट्रवादीच्या प्रगतीपुस्तकांत आभास

By Admin | Updated: July 27, 2015 03:43 IST2015-07-27T03:43:38+5:302015-07-27T03:43:38+5:30

तब्बल आठ वर्षांपासून आघाडीचा राजकीय पक्ष म्हणून राष्ट्रवादीचे नेते कारभार करीत आहेत. त्यानंतरही शहरातील मेट्रो, मोनोरेल, बीआरटी

Look into NCP's progress books | राष्ट्रवादीच्या प्रगतीपुस्तकांत आभास

राष्ट्रवादीच्या प्रगतीपुस्तकांत आभास

पुणे : तब्बल आठ वर्षांपासून आघाडीचा राजकीय पक्ष म्हणून राष्ट्रवादीचे नेते कारभार करीत आहेत. त्यानंतरही शहरातील मेट्रो, मोनोरेल, बीआरटी, ‘एचसीएमटीआर’ (अंतर्गत रिंगरोड), पीएमपीची बस खरेदी, पाणी पुरवठा, कचरा व मैलापाणी प्रक्रिया प्रकल्प रखडलेले आहेत, अशी कबुली राष्ट्रवादीचे नेते दस्तुरखुद्द अजित पवार यांनी दिली. मात्र,बहुतेक प्रकल्पांचे खापर विद्यमान राज्य व केंद्र शासनावर फोडण्यात आले. त्याचवेळी शहरातील उड्डाणपूल, भुयारी मार्ग, सभागृह, दवाखाने व पाणी शुध्दीकरण प्रकल्प उभारण्याची मांडणी करीत राष्ट्रवादीकडून तीन वर्षांच्या प्रगतीपुस्तकातून ‘विकासा’चा अभास निर्माण करण्यात आला आहे.
गेल्या तीन वर्षांपासून आणि त्याअगोदरची पाच वर्षे महापालिकेत राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. मेट्रो प्रकल्पाच्या प्रस्तावाला २००९ मध्ये मान्यता देण्यात आली. त्यावेळी केंद्र व राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता होती. त्यानंतरही पाच वर्षांत मेट्रो प्रकल्पाला मंजुरी मिळाली नाही. महापालिकेच्या जुन्या हद्दीच्या १९८७ च्या विकास आराखडात ३४ किलोमीटरच्या ‘एससीएमटीआर’ या अंतर्गत रिंगरोड प्रस्तावित होता. गेल्या २० वर्षांपासून भूसंपादना अभावी प्रकल्प रखडला आहे. आळंदी व नगर रस्त्यावरील बीआरटीच्या वाहतुकीला अदयाप मुहूर्त मिळालेला नाही. केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजने (जेएनएनयुआरएम) अंतर्गत निधी न मिळाल्याने पर्वती जलशुध्दीकरण केंद्राचा विस्तार रखडला आहे. मुख्य रस्त्यांचा विस्तार, उड्डाणपूल व रस्त्यांचे काँक्रेटीकरण करून वाहतूक प्रश्न व कोंडी सोडविण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादीच्या प्रगतीपुस्तकातून करण्यात आला आहे. प्रत्यक्षात वाहतूक कोंडी सोडविण्याचा एकही प्रकल्प पूर्ण झालेला नसल्याची वस्तुस्थिती आहे. राष्ट्रवादीने ५०० बस खरेदीचे आश्वासन दिले. प्रत्यक्षात ‘जेएनएनयुआरएम’चा निधी न मिळाल्याने एकही बस नव्याने खरेदी करण्यात आलेली नाही. महत्वाचे प्रकल्प रखडलेले असताना ‘कालचक्र प्रगती’चे म्हणत राष्ट्रवादीने विकासाचा अभास निर्माण केल्याचे दिसून येते. (प्रतिनिधी)

Web Title: Look into NCP's progress books

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.