शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

लोकमत वुमेन समीट २०१९ - झेप नेतृत्वाची : विजय दर्डा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 11:33 IST

‘आपापल्या संघर्षाच्या, धडपडीच्या, अपयशाच्या आणि अखेरीस झगडून मिळवलेल्या यशाच्या कहाण्या घेऊन, आज अनेक कर्तृत्ववान महिला या सभागृहात उपस्थित आहेत...

- विजय दर्डा-  

‘आपापल्या संघर्षाच्या, धडपडीच्या, अपयशाच्या आणि अखेरीस झगडून मिळवलेल्या यशाच्या कहाण्या घेऊन, आज अनेक कर्तृत्ववान महिला या सभागृहात उपस्थित आहेत. लोकमत वृत्तसमूहाच्या वतीने मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. अत्यंत कष्टातून आपलं आयुष्य उभारलेल्या एका कर्तृत्ववान स्त्रीचा मी पुत्र आहे. कुटुंबाची वीण घट्ट राहावी, म्हणून अखंड धडपडलेल्या एका प्रेमळ, स्नेहशील स्त्रीचा मी पती आहे. घराण्याच्या प्रतिष्ठेच्या पलीकडे, आपलं स्वत:चं क्षितिज शोधण्यात यशस्वी झालेल्या मुलीचा मी पिता आहे. माझ्या घरात सुखाच्या राशी घेऊन आलेल्या सुना आहेत. माझं दुसरं कुटुंब असलेल्या माझ्या कंपनीत, आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी कष्ट करणाऱ्या, कर्तबगार स्त्री सहकारी आहेत. राज्यसभेच्या सभागृहात काही ज्येष्ठ स्त्रिया माझ्या सहकारी होत्या.महिलांसाठी राजकीय आरक्षण आणि कौटुंबिक हिंसाचार विरोधातल्या विधेयकांच्या लढाईत मी त्यांच्या बाजूने उभा राहिलो होतो. आणि एक सांगतो, माझ्या आयुष्यातल्या या सर्व स्रियांचा मी मनापासून ॠणी आहे. स्त्री आणि पुरुष या दोघांचं कर्तृत्व वेगळ्या मापाने मोजण्याची आगळीक मी कधीही केलेली नाही. पण एक खरं, की भाकरीची तजवीज करण्यासाठी धडपडताना केसात सुगंधी फूल माळणारी स्त्रीच आहे. ती आहे म्हणून या जगात प्रेम आहे, स्पर्श आहे, संगीत आहे, समजूत आहे, स्थैर्य आहे आणि सुख आहे.आज आपण पुण्यात भेटतो आहोत. मुलींनी शिकावं म्हणून शेण झेलणाऱ्या सावित्रीबाईंचं हे शहर. परदेशात शिकायला जाणार म्हणून विरोध पेटला, तरी मागे न हटलेल्या आनंदीबाई जोशींचं हे शहर. पंढरीच्या विठोबाला ‘बॉयफ्रेंड’ म्हणणाऱ्या इरावती कर्वे इथल्याच. अनु आगांनी उद्योगाचं साम्राज्य विस्तारलं ते इथेच. स्वत:ची वेगळी ओळख घेऊन जगभरातल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये, आपला झेंडा उंचावणारी बंडखोर राधिका आपटे पुण्यातलीच. या शहराचा स्वभावच बंडखोर आणि तिखट. अशा सळसळत्या पुण्यात ‘लोकमत वुमेन समीट’ नावाचं हे व्यासपीठ, आज एक एल्गार करतं आहे- लीव्ह टू लीड!कुणीतरी आखलेल्या वाटेवरून मुकाट चालण्यासाठी जगू नका. स्वत:च स्वत:ची वाट शोधा. स्वत:च स्वत:चं निशाण व्हा. आणि आपल्या आयुष्याचं, आपल्या स्वप्नांचं नेतृत्व स्वत:च करा! ... लीव्ह टू लीड! अशी घोषणा करण्यासाठी हिंमत लागते. आत्मविश्वास लागतो. येईल त्या संकटांचा सामना करण्याची तयारी असावी लागते. आणि मुख्य म्हणजे समाजातल्या, कुटुंबातल्या अडथळ्यांच्या शर्यतीतून, गोंधळ-गर्दीतून, आपलं यश नेमकं कोरून काढण्यासाठीचं कौशल्यही अंगी असावं लागतं. हे सारं भारतीय स्त्रियांना सहजासहजी मिळालेलं नाही, याची मला जाणीव आहे. देश स्वतंत्र झाला, तेव्हा या देशातल्या स्त्रियांना एकच गोष्ट सहज मिळाली होती : मत देण्याचा अधिकार. पण ते मत आपला राजकीय प्रतिनिधी ठरवण्यासाठीचं होतं. घरात आज कोणती भाजी करावी, इथपासून आपलं लग्न कधी व्हावं, आपल्याला मुलं किती असावीत इथपर्यंत कशातच त्यांचं मत कधी कुणी विचारलं नाही. ही परिस्थिती पालटण्यासाठी पहिल्यांदा पुढे आले, ते काही दूरदर्शी पुरुषच होते; हे मात्र ‘लोकमत विमेन समीट’सारख्या व्यासपीठांनी मान्य करायला हवं. बंगालमध्ये राजा राममोहन रॉय होते. इथे पुण्यात महात्मा फुले होते. आगरकर होते. अण्णासाहेब कर्वे होते. समाजाने, समाजातल्या व्यवस्थेने कोंडून टाकलेल्या स्त्रियांसाठी या दूरदर्शी नेत्यांनी पहिली खिडकी उघडली... नंतरचं श्रेय मात्र या देशातल्या प्रत्येक स्त्रीचं आहे. देशाचं पंतप्रधानपद भूषविणं असो, नाहीतर कुठल्यातरी खुर्द-बुद्रुक गावात बचतगट उभारणं असो; जिने-तिने आपापल्या आवाक्यातल्या खिडक्या उघडण्याची धडपड कधीही थांबवली नाही. एक साधा प्रश्न विचारतो मी तुम्हाला, गेल्या दहा वर्षांत भारताच्या राजकीय क्षितिजावर सर्वात प्रभावशाली ठरलेल्या आणि सर्वाधिक वेगाने पायºया चढत गेलेल्या व्यक्तीचं नाव काय? कोण ती व्यक्ती?जो चेहरा स्वाभाविकपणे तुमच्या नजरेसमोर येईल, ते या प्रश्नाचं उत्तर आहे खरं; पण ते एकमेव उत्तर नाही. या प्रश्नाचं अधिक योग्य उत्तर आहे : निर्मला सीतारामन. भारतीय जनता पक्षाच्या पक्षसंघटनेतून प्रवक्ता म्हणून काम सुरू केलेल्या निर्मला सीतारामन अल्पावधीत देशाच्या संरक्षणमंत्री झाल्या, पुढे केंद्रीय अर्थमंत्री झाल्या! ही झेप केवळ थक्क करणारी आहे. एवढंच फक्त, की सीतारामनबाई फार बोलत नाहीत! अबोल राहून अविरत कष्ट आणि कर्तबगारीवर इतकं लखलखीत राजकीय यश मिळवलेली दुसरी व्यक्ती सापडणं अवघड आहे. संसदेमध्ये देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना  ‘नारी तू नारायणी!’ असा घोष करणाऱ्या निर्मला सीतारामन मला एका बाजूला दिसतात.आणि दुसरीकडे आहे आपली वेगळी लैंगिक ओळख हिमतीने जाहीर केल्यावर झालेल्या विरोधाची, टीकेची पर्वा न करता खेळाच्या मैदानावर सुसाट धावत सुटलेली द्युती चंद! केवळ तेवीस वर्षाची ही हिंमतबाज मुलगी म्हणते,  ‘ यू पुल मी डाऊन, आय विल कम बॅक स्ट्राँगर!’ विरोध करा. त्रास द्या. माझ्या पायात बेड्या घाला. मला खाली खेचण्याचा प्रयत्न करा; तुम्हाला वाट्टेल ते करा; मी दुप्पट हिमतीने अशीच धावत राहीन!!!द्युती चंद जे म्हणते तेच आधुनिक भारतीय स्त्रीचं घोषवाक्य असलं पाहिजे, असं मला वाटतं. ‘ यू पुल मी डाऊन, आय विल कम बॅक स्ट्राँगर!’ आणखी एक विनंती आहे माझी. मान्य आहे, की भारतीय स्त्रियांच्या आजवरच्या प्रवासात अडथळे सततच आले. अजूनही आहेत. यातल्या बहुतेक अडथळ्यांना पुरुषच जबाबदार असतात. वडील म्हणून, नवरा म्हणून, सहकारी म्हणून... वेगवेगळ्या नात्यांनी आयुष्यात येणारा पुरुष! म्हणूनच त्याच्याकडे काहीशा संशयी नजरेने पाहण्याची दृष्टी इथल्या व्यवस्थेनेच स्त्रियांना दिली आहे. माझी विनंती आहे ती एवढीच, की नव्या पिढीतल्या कर्तबगार स्त्रियांनी हा जुना चष्मा नजरेवरून उतरवावा. आपल्या यशोगाथेचे ‘भागीदार’ म्हणून पुरुषांकडे पाहण्याची सुरुवात स्त्रियांनी करावी.  स्त्री आणि पुरुष या दोघांमध्येही हा संवाद आणि समजूत आपण निर्माण करू शकलो, तर खूप मोठी मानसिक ऊर्जा वाचेल. पण हे प्रत्यक्षात कसं येणार? जुन्या लढाया आणि परंपरेने चालत आलेल्या समजुती सोडून त्यासाठी पुढाकार कोण घेणार? आंघोळीनंतर ओला टॉवेल पलंगावर टाकू नये हेही अजून अनेक पुरुषांना कळत नाही, हे मला मान्य आहे. अशा आळशी पुरुषांना एवढा मोठा बदल स्वत:हून आपल्या आयुष्यात कसा करता येईल?  ही शंका मलाही येते.पण कुणाला तरी सुरुवात करावी लागेलच ना? ती स्त्रियांनी करावी. तरुण मुलींनी करावी. मला अपेक्षित असलेल्या या बदलाची सुरुवात करण्यात ‘लोकमत’ पुढाकार घेईल, हेही मी इथे जाहीर करतो. लीव्ह टू लीड!हे या देशातल्या स्त्रियांचं स्वप्न असलं पाहिजे. या देशातल्या पुरुषांनीही ते तितक्याच उत्साहाने पाहिलं पाहिजे. या स्वप्नांच्या वाटेवरून धावताना अडथळे येतील. विरोध होईल, तेव्हा द्युती चंद काय म्हणते ते लक्षात ठेवलं पाहिजे. ती म्हणते, ‘ यू पुल मी डाऊन, आय विल कम बॅक स्ट्रॉंगर!’ धन्यवाद!

............* महिलांच्या प्रश्नांची राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा होण्यासाठी लोकमत वुमेन समीटची मोठी भूमिका राहिली आहे. समाजातील ज्वलंत प्रश्नांवर येथे चर्चा होते. आजच्या जागतिकीकरणाच्या, गतिमानतेच्या युगात समाजाचा अर्धा हिस्सा असणाºया स्त्रीशक्तीचा आवाज बुलंद होत आहे. लोकसभेत ७८ महिला निवडून आल्या आहेत. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात महिला नेतृत्व करीत आहेत. महिलांच्या नेतृत्वाला सलाम करण्यासाठीच ‘लिव्ह टू लीड’ ही यंदाच्या वुमेन समीटची संकल्पना आहे. सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी, रमाबाई रानडे आणि लक्ष्मीबाई टिळक यांच्या काळाचा मागोवा घेत समकालीन विषयांवर चर्चा होईल. .......

टॅग्स :Lokmat Women Summitलोकमत वुमेन समीटVijay Dardaविजय दर्डाWomenमहिलाLokmat Eventलोकमत इव्हेंटTaapsee Pannuतापसी पन्नूVijaya Rahatkarविजया रहाटकर