लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचं निधन, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 09:16 IST2025-07-16T09:15:37+5:302025-07-16T09:16:20+5:30

डॉ. दीपक टिळक यांच्या निधनामुळे राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील एक मार्गदर्शक असे उत्तुंग व्यक्तिमत्व हरपले आहे असं मुख्यमंत्री म्हणाले.

Lokmanya Tilak's great-grandson Dr. Deepak Tilak passes away, CM Devendra Fadnavis expresses condolences | लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचं निधन, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचं निधन, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

पुणे - केसरीचे विश्वस्त आणि लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे पुण्यातील राहत्या घरी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला. 'लोकमान्य टिळक यांचा महाराष्ट्रातील समाजकारणातील विविधांगी क्षेत्रातील वारसा समर्थपणे चालविणारे लोकाभिमुख, मार्गदर्शक असे व्यक्तिमत्व असलेले दीपक टिळक यांच्या निधनामुळे अनेक सामाजिक संस्थांचा आधारस्तंभ हरपला आहे अशा शोकभावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केल्या. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकमान्य टिळक आणि त्यांचे सुपुत्र दिवंगत जयंत टिळक यांच्याकडून मिळालेला वारसा डॉ. दीपक टिळक यांनी समर्थपणे चालविला. ते राजकारणात फारसे रमले नाहीत. पण लोकमान्य टिळक यांनी पाया घातलेल्या दैनिक केसरी तसेच शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील कार्य त्यांनी तितक्याच जबाबदारीने सांभाळले. यातून ते कित्येक सामाजिक संस्था, संघटना, विश्वस्त मंडळांचे आधारस्तंभ ठरले. त्यांच्या पुढाकाराने अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील उपक्रमांना समाजातून पाठबळ मिळत राहिले. डॉ. टिळक हे व्यवस्थापन आणि पत्रकारिता क्षेत्रातील अभ्यासक, संशोधक राहिले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक होतकरू युवकांनाही या क्षेत्रातील संशोधनाची प्रेरणा मिळाली. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात भरीव असे कार्य केले आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच डॉ. दीपक टिळक यांच्या निधनामुळे राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील एक मार्गदर्शक असे उत्तुंग व्यक्तिमत्व हरपले आहे. ही या क्षेत्रासाठी हानी आहे. टिळक यांच्या निधनामुळे त्यांच्या परिवारावर, विविध संस्था, संघटना आणि सामाजिक उपक्रमांशी निगडित कार्यकर्ते यांच्यावर दुःखाचा आघात झाला आहे. या सर्वांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांना हे दुःख सहन करण्याची ताकद मिळो, अशी ईश्वराला प्रार्थना करतो. डॉ. दीपक टिळक यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थना करतो आणि त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही व्यक्त केल्या शोकभावना

दरम्यान, जपानी भाषेच्या प्रसारासाठी डॉ. दीपक टिळक यांनी केलेल्या कार्याची जपान सरकारनेही दखल घेतली होती. तसेच, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांचे कार्य हे नव्या पिढीसाठी प्रेरणादायी होते. ते एक विचारवंत, कुशल प्रशासक, संवेदनशील पत्रकार आणि समर्पित समाजसेवक होते. त्यांच्या जाण्याने पुणे शहराच्या सार्वजनिक जीवनात पोकळी निर्माण झाली आहे अशी भावना अजित पवारांनी बोलून दाखवली.  

Web Title: Lokmanya Tilak's great-grandson Dr. Deepak Tilak passes away, CM Devendra Fadnavis expresses condolences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.