पुणे : वाहिन्यांवरून प्रक्षेपित होणारे कल, ज्योतिष्यांचे अंदाज, जाणकारांकडून मिळणारी माहिती, आपापल्या ‘पॉकेट’मधून मिळणारा प्रतिसाद, बाबा-महाराज, बुवा यांचे कौल या साऱ्यांच्या विश्लेषणातून उमेदवार आणि त्यांचे आप्तस्वकीय विजयाच्या निष्कर्षापर्यंत जात आहेत. इतरांशी चर्चा करून निष्कर्षाची पडताळणी घेताना दिसले. नागरिकांमध्येही जय-पराजयाच्या चर्चांना उधाण आले आहे.मतदान यंत्रांमध्ये बंदिस्त असलेल्या मतदानाचा अंदाज बांधून उमेदवार व त्यांचे समर्थक बुधवारी तर्कवितर्क लढविण्यात गुंग झाले होते. घडामोडींचा आपल्याला काय फायदा-तोटा होईल, याची गणिते बांधतच उमेदवारांनी गुरुवार सकाळची प्रतीक्षा करत रात्र घालविली. अनेकांच्या मनातील धाकधूक संपलेली नाही. सकाळपासून सुहास्य मुद्रेने उत्साहाने सर्वत्र फिरून उमेदवारांनी मतदारांना आपले दर्शन घडविले. यशाची खात्री वाटू लागलेला एखादा उमेदवार सर्वच मतदान केंद्रांमध्ये जाऊन काय स्थिती आहे, पाहताना दिसत होता. विश्वासू कार्यकर्त्यांकडून कोणत्या ठिकाणचे मतदान राहिले आहे, कोणत्या ठिकाणचे झाले आहे, याचा अंदाज घेत होते. (प्रतिनिधी)पॅनेल निवडून आणण्याचा चंग संपूर्ण पॅनेल निवडून आणण्याचा चंग काहीजणांनी बांधला आहे. मात्र प्रवाही राजकारणामुळे गेल्या दोन दिवसांमध्ये बऱ्या वाईट घटना झाल्या. कोणाला गावकी, भावकीचा त्रास झाला. तर पॅनेलमधील कोणाविषयी गैरप्रकारांमुळे दबकी चर्चा झाली. सुरुवातीपासूनच पॅनेलसह प्रचार करणाऱ्यांनी प्रचारात आघाडी घेतल्याने त्यांचा विश्वास दुणावला आहे. विद्यमान नगरसेवक असलेल्या काही उमेदवारांना त्यांच्या यशाची खात्री सुरुवातीपासून आहे. मतदान संपल्यानंतर उमेदवारांनी गेल्या काही दिवसांपासूनचे आडाखे, प्रत्यक्ष आलेला अनुभव यांच्या जोरावर यश-अपयशाची गणिते बांधणे सुरू केले आहे. जाणकारांशी संपर्क साधून त्यांनी काय होईल, याचा अंदाज घेतला. दिवसभराचा शीण घालवतानाही शक्यशक्यतांच्या चर्चा सुरूच राहिल्या.
तर्कवितर्कांना आले उधाण
By admin | Updated: February 23, 2017 03:35 IST