लॉकडाऊनमुळे घरात राहणाऱ्यांमध्ये उडाले वादाचे ‘फटाके’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:12 IST2021-06-09T04:12:38+5:302021-06-09T04:12:38+5:30
- दुस-या लॉकडाऊनमध्ये समुपदेशाने समझोत्यांचे प्रमाण वाढले लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लॉकडाऊनच्या काळात सर्व जण घरात आहेत. त्यामुळे ...

लॉकडाऊनमुळे घरात राहणाऱ्यांमध्ये उडाले वादाचे ‘फटाके’
- दुस-या लॉकडाऊनमध्ये समुपदेशाने समझोत्यांचे प्रमाण वाढले
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लॉकडाऊनच्या काळात सर्व जण घरात आहेत. त्यामुळे एरवी कधीही घरातील लहान-मोठ्या कामात लक्ष न देणारे आता लक्ष देऊ लागले आहेत. त्यामुळे घरांमध्ये कुरबुरी वाढू लागल्या आहेत. भरोसा सेलकडे अशा तक्रारी येण्याचे प्रमाणही वाढले आहे. मात्र, त्याचवेळी अशा संकटप्रसंगी एकत्र राहण्याची किंमतही समजली आहे. समुपदेशाने अशा घटनांमध्ये समझोता होण्याचे प्रमाणही वाढले आहे.
दुसऱ्या लॉकडाऊनचे निर्बंध हळूहळू शिथिल होत आहेत. २०२१ मधील वर्षातील पहिल्या ५ महिन्यांत भरोसा सेलकडे १०६५ तक्रारी आल्या आहेत. त्यातील १४७ प्रकरणात समझोता झाला आहे. ७२२ प्रकरणात समुपदेशन सुरू आहे. दुस-या लॉकडाऊनच्या या दोन महिन्यांच्या काळात पुणे पोलिसांच्या भरोसा सेलकडे तब्बल ३०५ तक्रारी आल्या होत्या. त्यातील १०४ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून २०१ प्रकरणात समुपदेशन सुरू आहे. तक्रारी वाढल्या असल्या तरी समझोता होण्याचे प्रमाणही वाढले असल्याचे दिसून येत आहे.
पुणे पोलीस दलात २०१९ मध्ये भरोसा सेलची स्थापना करण्यात आली. एकाच छत्राखाली महिला, बाल आणि ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न येथे केला जातो. पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली येथील कामकाज चालते.
उच्च शिक्षित वर्गात पूर्वी एकमेकांना पुरेसा वेळ देत नसल्यामुळे खटके उडण्यास सुरुवात होत होती. त्यातून महिला थेट राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार करून न्याय मागत. या तक्रारी पुणे पोलिसांच्या भरोसा सेलअंतर्गत महिला सहायता कक्षाकडे येत. येथे दोघांचे समुपदेशन करून त्यांना समजावून सांगितले जात. त्यातून त्यांची समजूत काढली जाते.
....
अन् त्याने मान्य केले तिचे अस्तित्व
ती द्विपदवीधर. पण लग्न झाल्यानंतर पतीच्या कलाने सर्व गोष्टी घेतल्या. छोट्या छोट्या गोष्टीतही तो आपली इच्छा तिच्यावर लादायचा. त्यातून त्यांची मुलगीही त्याला घाबरू लागली. आता तो तुला काहीच मत नाही, असे म्हणून तिला घराबाहेर काढू लागला. दोघांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर त्याचे वडीलही आईशी असेच वागायचे, हे लक्षात आले. भरोसा सेलमध्ये त्याचे समुपदेशन करण्यात आले. तिने स्वत:चे मन मारून तुम्हालाच केलेली साथ हे तुमच्यावर असलेले प्रेम आणि नात्यातील एकनिष्ठता आणि संसाराचे महत्त्व त्यांच्या लक्षात आणून दिले. मी बाबांपेक्षा जास्त शिकलो. पण जगण्याच्या शाळेतील नात्याचे शिक्षण मला त्यांच्यापेक्षा जास्त घेता आले नाही, अशी मनाने कबुली देत त्याने अश्रुंद्वारे तिची माफी मागितली.
...
वर्षतक्रारी समझोतासमुपदेशन सुुरू
२०२१ १०६५ १४७ ७२२
२०२० २०७४ १३३० १२१
.......
भरोसा सेलकडे आलेल्या तक्रारींपैकी २०२० मध्ये १२५ प्रकरणात समझोता होऊ शकला नाही. त्यांना घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयाकडे जाण्यास सांगण्यात आले. तर, ११५ प्रकरणात पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला. २०२१ मधील ५ महिन्यांत ३४ प्रकरणात समझोता होऊ शकला नाही. तसेच ३४ प्रकरणे पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यासाठी सोपविण्यात आली.
..
या लॉकडाऊनच्या काळात कौटुंबिक तक्रारी वाढल्या. त्याचबरोबर एकत्र येण्याची व एकत्र राहण्याची किंमत दोघांनाही कळली. त्यामुळे समझोता होण्याचे प्रमाणही वाढले आहे.
सुजाता शानमे, सहायक पोलीस निरीक्षक, भरोसा सेल