‘माळेगाव’वर ४५ कोटींचेच कर्ज
By Admin | Updated: March 28, 2015 23:49 IST2015-03-28T23:49:22+5:302015-03-28T23:49:22+5:30
माळेगांव सहकारी साखर कारखान्यावर फक्त ४५ कोटी रूपयांचे कर्ज आहे. विरोधकांकडून कर्जाबाबत खोटी आकडेवारी सादर केली जात आहे.

‘माळेगाव’वर ४५ कोटींचेच कर्ज
बारामती : माळेगांव सहकारी साखर कारखान्यावर फक्त ४५ कोटी रूपयांचे कर्ज आहे. विरोधकांकडून कर्जाबाबत खोटी आकडेवारी सादर केली जात आहे. त्याच बरोबर भविष्यात खासगी कारखान्यांबरोबर स्पर्धा करावी लागणार आहे. सहकारी कारखान्यांनी चांगला दर दिला, तर ऊस उत्पादक कशाला खासगी कारखान्यांकडे जातील, असा दावा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
माळेगांव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारार्थ निलकंठेश्वर पॅनलच्या खांडज (ता. बारामती) येथे झालेल्या सभेत पवार बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांच्यासह तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
कारखान्यावर विरोधकांकडून जादा कर्ज असल्याचे सांगितले जाते. मात्र, उत्पादीत झालेल्या साखर पोत्यावरील कर्जा व्यतिरिक्त कर्ज नाही. ते ४५ कोेटी रूपये आहे. साखर विक्री झाल्यावर या कर्जातून देखील कारखाना मुक्त होणार आहे, असा दावा त्यांनी केला.
भाव बसत नसताना जादा देण्याच्या प्रयत्नाने श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना अडचणीत आला. ज्या अध्यक्षांच्या काळात घडले. त्यांना पदावरून काढले. आज साखर उद्योग अडचणीत आहे. केंद्र व राज्य सरकार त्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे अडचणी अधिक वाढल्या आहेत. नवीन सहकारी साखर कारखाने काढण्यासाठी राज्य सहकारी बॅँक कर्ज देत नाही. बारामतीत एकही खासगी साखर कारखाना नाही. बारामतीच्या आसपासच्या तालुक्यात खासगी कारखाने झाले आहेत. मात्र, भविष्यात खासगी कारखान्यांशी स्पर्धा करावी लागणार आहे, असे सांगण्यास अजित पवार विसरले नाहीत. यावेळी बाळासाहेब तावरे यांनी कारखाना आर्थिक सक्षम आहे. विरोधकांकडून केले जात असलेले आरोप खोडसाळपणाचे आहे. सभेला संभाजीराव होळकर, किरण गुजर, पोपटराव तुपे, रमेश गोफणे, अनिल जगताप, नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, पंचायत समिती सभापती करण खलाटे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
४पवार म्हणाले, माळेगांव कारखान्याला चांगले दिवस आणण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरले आहे. मात्र, विरोधक मीच सर्व काही केले, असे सभासदांना सांगत सुटले आहे. उद्या विद्या प्रतिष्ठान, शारदानगर शैक्षणिक संकूल देखील आपणच काढले, असे म्हणण्यास देखील कमी करणार नाहीत, असा टोला विरोधी पॅनलचे नेते चंद्रराव तावरे यांचे नाव न घेता मारला. ‘या माणसाच्या हट्टीपणाला कळसच आहे. यापूर्वी देखील याच कारखान्याच्या निवडणूकीच्या निमित्ताने रूसवे, फुगवे निघाल्याशिवाय प्रचाराला बाहेर पडले नाहीत, याला आपण स्वत: साक्षीदार असल्याचा आरोप पवार यांनी तावरे यांच्यावर केला.