नगर-कल्याण महामार्गावरील पिंपरी पेंढार येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 13:31 IST2018-02-21T13:27:16+5:302018-02-21T13:31:05+5:30
नगर-कल्याण महामार्गावरील पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) येथे सोमवारी रात्री भक्ष्याच्या शोधातील विहिरीत पडलेल्या बिबट्याला मंगळवारी वनविभागाने सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले.

नगर-कल्याण महामार्गावरील पिंपरी पेंढार येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान
पिंपरी पेंढार : नगर-कल्याण महामार्गावरील पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) येथे सोमवारी रात्री भक्ष्याच्या शोधातील विहिरीत पडलेल्या बिबट्याला मंगळवारी वनविभागाने सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले. ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. रघतवान यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी संभाजी तपासे यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती वनविभागाला मिळाली. ही माहिती माणिकडोह बिबट निवारा केंद्रातील डॉ. महेंद्र ढोरे यांना दिली. ते त्वरित घटनास्थळी त्यांच्या पथकासह हजर झाले. विहिरीच्या बाजूने संरक्षक जाळी लावून पिंजरा लावला होता. बिबट्या विहिरीत एका कपारीवर बसला होता. शिडी सोडली होती. दुसरा मार्ग नसल्याने बिबट्या शिडीने वर आला व पिंजऱ्यात जेरबंद झाला. हा बिबट्या नर जातीचा असून, त्याचे वय सुमारे पाच ते सहा वर्षे असावे. विहिरीत पडलेला बिबट्या पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.