शाकाहाराचे पुरस्कर्ते डॉ. कल्याण गंगवाल यांना जीवनगौरव पुरस्कार; नवी दिल्लीत रंगला सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 13:27 IST2017-12-16T13:24:38+5:302017-12-16T13:27:40+5:30
नवी दिल्ली येथील बाबू जगजीवनराम साहित्य संस्कृती अकादमीतर्फे दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार पुण्यातील शाकाहाराचे पुरस्कर्ते डॉ. कल्याण गंगवाल यांना प्रदान करण्यात आला.

शाकाहाराचे पुरस्कर्ते डॉ. कल्याण गंगवाल यांना जीवनगौरव पुरस्कार; नवी दिल्लीत रंगला सोहळा
पुणे : नवी दिल्ली येथील बाबू जगजीवनराम साहित्य संस्कृती अकादमीतर्फे दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार पुण्यातील शाकाहाराचे पुरस्कर्ते डॉ. कल्याण गंगवाल यांना प्रदान करण्यात आला. दिल्लीतील राजेंद्र भवनात मंगळवारी झालेल्या १३ व्या आंतरराष्ट्रीय आंतरभाषा विजय दिवस सन्मान संमेलनात लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीराकुमार आणि दिलीचे समाजकल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम यांच्या हस्ते डॉ. गंगवाल यांना हा पुरस्कार देऊन सपत्नीक सन्मानित करण्यात आले.
यावेळी बाबू जगजीवन राम कला, संस्कृती व साहित्य अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नफेसिंह खोबा, नेपाल भारत दलित मैत्री संघाचे अध्यक्ष ओमप्रकाश विश्वकर्मा, सौ. डॉ. चंद्रकला गंगवाल, राज्यसभा खासदार पी. एल. पुनियाजी, डॉ. सत्यनारायण जटियाजी, लोकसभा खासदार डॉ. टी. मेइन्या, राजेंद्र भवनचे सचिव आर. एल. भगत, युवानेते अंशुल अविजित, आमदार शरद चौहान, पुण्यातील महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव डॉ. विकास आबनावे, सदस्य प्रसाद आबनावे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
संगमनेर आणि अकोला तालुक्यातील आदिवासी ठाकर समाजासाठी मोफत वैद्यकीय सेवा पुरविण्याचे काम गेली अनेक वर्षे डॉ. गंगवाल करीत आहेत. त्याचबरोबर समाजात अहिंसा रुजावी, व्यसनमुक्ती व्हावी आणि पशुबळी विरोधी चळवळ उभारावी, यासाठी डॉ. गंगवाल यांनी व्यापक काम केले आहे. त्यांच्या वैद्यकीय आणि अहिंसा सेवा क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. ‘वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील सेवेबद्दल झालेला हा गौरव नवी उर्मी देणारा आहे, अशा शब्दांत डॉ. गंगवाल यांनी आनंद व्यक्त केला.