ज्ञानेश्वरी गटाचा परवाना रद्द
By Admin | Updated: August 17, 2015 02:27 IST2015-08-17T02:27:24+5:302015-08-17T02:27:24+5:30
केशवनगर येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये अनधिकृत धान्याचा साठा ठेवल्याच्या तक्रारीवरून पुरवठा विभागाने ज्ञानेश्वरी महिला बचत गटाचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला आहे

ज्ञानेश्वरी गटाचा परवाना रद्द
मुंढवा : केशवनगर येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये अनधिकृत धान्याचा साठा ठेवल्याच्या तक्रारीवरून पुरवठा विभागाने ज्ञानेश्वरी महिला बचत गटाचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला आहे.
केशवनगर येथे बेकायदेशीर रॉकेलसाठ्यावर कारवाईनंतर २३ जुलैला एका लेखी तक्रारीवरू न पुरवठा विभागाने केशवनगर-मुंढवा, पवार वस्ती, सर्व्हे नं. ५ येथे एका पत्र्याच्या गोदामात असलेला अनधिकृत धान्यसाठा जप्त केला. हा साठा काळाबाजार करण्याच्या उद्देशाने साठवल्याचा अहवाल परिमंडळ ई यांनी अन्नधान्य वितरण कार्यालयाला २८ जुलैला सादर केला. त्यात धान्य साठवणुकीची पूर्वपरवानगी न घेणे, बेकायदेशीर साठवणूक करणे आदी अहवालात नमूद करण्यात आले आहे. परिमंडळ ई यांच्या परवाना क्र. ई १९४ यानुसार तपासणीत दुकानात पंचनामा रजिस्टर नसणे, मासिक अहवाल न सादर करणे, परवानाधारकाने साठाफलक व भावफलक न लावणे, हा परवाना निळकंठ माणिकशेट्टी चालवत असल्याचे दोष नमूद केले आहेत. अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी जीवनावश्यक वस्तूच्या कायदा १९५५, १९७५ मधील अटींचा भंग केल्याने ज्ञानेश्वरी महिला बचत गटाचा कायमस्वरूपी परवाना रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान,अतिरिक्त साठ्याची विल्हेवाट कधी लावणार, हे निश्चित नसल्याने साठा खराब होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या प्रकरणी सूत्रधारांवर कारवाई न केल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा तक्रारदार योगेश नाईक यांनी दिला आहे. तर, दुसरीकडे ११ हजारांपेक्षा अधिक प्रमाणात सापडलेल्या रॉकेलचा साठा व त्याचा तपास, आरोपी याबाबत अद्याप काहीच माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. (वार्ताहर)