‘ळ’च्या वापरासाठी माजी संमेलनाध्यक्षांचे पंतप्रधानांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:38 IST2020-11-22T09:38:17+5:302020-11-22T09:38:17+5:30

पुणे : केंद्र सरकारची कार्यालयीन भाषेमध्ये ‘ळ’ या वर्णाचा समावेश केला आहे. ‘ळ’ च्या वापराबाबत केंद्र सरकारने तातडीने अंमलबजावणी ...

Letter from the former Conference President to the Prime Minister for the use of ‘L’ | ‘ळ’च्या वापरासाठी माजी संमेलनाध्यक्षांचे पंतप्रधानांना पत्र

‘ळ’च्या वापरासाठी माजी संमेलनाध्यक्षांचे पंतप्रधानांना पत्र

पुणे : केंद्र सरकारची कार्यालयीन भाषेमध्ये ‘ळ’ या वर्णाचा समावेश केला आहे. ‘ळ’ च्या वापराबाबत केंद्र सरकारने तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. नागनाथ कोतापल्ले आणि डॉ. सदानंद मोरे या तीन माजी संमेलनाध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या पत्रामुळे २०१८ पासून ‘ळ’च्या वापरासाठी विविध पातळयांवर झगडत असलेल्या प्रकाश निर्मळ यांच्या प्रयत्नांना बळ मिळणार आहे.

केंद्र सरकारने आपल्या कार्यालयीन भाषेत अर्थात, प्रमाण हिंदीमध्ये हा वर्ण समाविष्ट केला असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. या वर्णाच्या प्रत्यक्ष वापराची अंमलबजावणी केंद्र सरकारची सर्व मंत्रालये व रेल्वे, टपाल, बँका अशा ठिकाणी त्वरित व्हावी अशी अपेक्षाही याद्वारे व्यक्त व्यक्त करण्यात आली आहे.

भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे नामकरण उर्दू आणि उत्तर प्रदेशी हिंदीत ‘तिलक’ असे झाले आहे. मात्र, हिंदी समुहाच्या विविध लोकभाषांमध्येच ‘ळ’ हा उच्चार असल्याने व केंद्र सरकारच्या कार्यालयीन हिंदीनेही तो आता त्यांच्या वर्णमालेत समाविष्ट केला असल्याने यापुढे त्यांचे नामकरण ‘तिलक’ असे करु नये, असे सुचवण्यात आले आहे.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे सर्व हिंदी साहित्य, परिपत्रकेम नामपट्टीका इत्यादीमध्ये झालेले नामांतर मागे घेण्याच्या सूचना जारी कराव्यात, मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसची हिंदीतील नामपट्टिका त्यांच्या मूळ नावानुसार पूर्ववत करून घ्यावी. रेल्वेप्रमाणेच महामार्ग विभाग, विमानतळे, टपाल कार्यालये, बँका व वित्तीय संस्था, आयकर कार्यालये, गृह व संरक्षण विभागाची कार्यालये, न्याय पालिका इत्यादी सर्व ठिकाणी मुलत: ‘ळ’ उच्चार असलेली स्थान अथवा व्यक्ती नामे असल्यास व तिथे ‘ळ’ऐवजी दुसरा वर्ण वापरला गेला असल्यास नव्याने दुरुस्ती करून घ्यावी. आवश्यक असल्यास त्यासाठी योग्य कायदेशीर तरतूद करून घ्यावी व या नियमांचे काटेकोरपणे पालन होईल याचीही दक्षता घेतली जावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

-------

हिंदी समूहाच्या भाषांमध्ये ‘ळ’ या अक्षराचा समावेश असूनही त्याचा उच्चार ‘ल’ असाच केला जातो. यामध्ये बदल व्हावा यासाठी २०१८ पासून केंद्र शासन, राजभाषा विभाग यांच्याशी पत्रव्यवहार सुरु होता. सेंट्रल हिंदी डायरेक्टोरेटने ‘ळ’ वापरात आणण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे स्पष्टीकरण दिले. साहित्यिकांच्या पत्रामुळे या प्रक्रियेला गती मिळू शकेल.

- प्रकाश निर्मळ

Web Title: Letter from the former Conference President to the Prime Minister for the use of ‘L’