अ‍ॅमेनिटी स्पेसच्या जागेत पत्र्याच्या कोठ्या

By Admin | Updated: July 3, 2017 03:25 IST2017-07-03T03:25:57+5:302017-07-03T03:25:57+5:30

कात्रज येथील राजस सोसायटीच्या अ‍ॅमिनिटी स्पेसच्या जागेत नव्याने तयार झालेल्या कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने

Letter from Amnesty Space | अ‍ॅमेनिटी स्पेसच्या जागेत पत्र्याच्या कोठ्या

अ‍ॅमेनिटी स्पेसच्या जागेत पत्र्याच्या कोठ्या

लोकमत न्यूज नेटवर्क
कात्रज : कात्रज येथील राजस सोसायटीच्या अ‍ॅमिनिटी स्पेसच्या जागेत नव्याने तयार झालेल्या कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी पत्र्याच्या कोठ्या उभारण्यास सुरुवात करण्यात आली होती. मात्र येथील स्थानिक नागरिक, नगरसेवक वसंत मोरे तसेच नगरसेवक प्रकाश कदम यांनी यासाठी विरोध केला आहे. त्यामुळे क्षेत्रीय अधिकारी व नगरसेवकातील हा वाद विकोपाला जाण्याचे संकेत या ठिकाणी मिळत आहेत.
कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय पुणे महापालिकेच्या वतीने तयार करण्यात आले आहे. या क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग ३८ हा येतो. प्रभाग ३८ मधील राजस सोसायटीमध्ये सर्वे नं. २२/१ मध्ये कमलासिटी सोसायटीची १० गुंठे असलेली ही अ‍ॅमिनिटी स्पेसची जागा पालिकेला हस्तांतरित करण्यात आलेली आहे. या ठिकाणी पालिकेकडून ओटा मार्केटचे आरक्षण टाकण्यात आलेले आहे. मात्र सध्या त्या ठिकाणी गणपती विसर्जन हौद बांधण्यात आलेला आहे. या ठिकाणी असलेल्या गणेश विसर्जन हौदात सुखसागरनगर भाग १ व २, राजस सोसायटी, विद्यानगर, महावीरनगर, आनंदनगर परिसरातील सुमारे तीन ते चार हजार गणपतींचे विसर्जन होते. त्यामुळे कात्रज तलावावरील विसर्जनाचा ताण कमी होतो. महिनाभरावर गणेशोत्सव आला आहे. मात्र या ठिकाणी जर स्थापत्य कोठ्या झाल्या तर या भागातील नागरिकांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे नागरिकांचा यासाठी विरोध होत आहे. येथील नागरिकांनी हे काम थांबण्यासाठी या संदर्भात मनसे गटनेते वसंत मोरे व नगरसेवक प्रकाश कदम यांना निवेदन देऊन सदरचे काम थांबवण्याची मागणी केली. त्यानुसार दोन्ही नगरसेवकांनी जागेची पाहणी करत काम थांबविण्याची सूचना क्षेत्रीय कार्यालय प्रशासनाला दिल्या आहेत.
नगरसेवक वसंत मोरे यांनी सांगितले, की पुणे महानगरपालिकेने अ‍ॅमेनिटी स्पेसची जागा ही नागरिकांना सेवा मिळेल, या हेतूने ताब्यात घेतलेली असते. येथील नागरिकांना सुविधा देणाऱ्या गोष्टीच या ठिकाणी झाल्या पाहिजेत. या प्रभागात माऊली गार्डन व पॅरामाऊंट गार्डन येथे दोन मोठ्या जागा पालिकेला हस्तांतरित करण्यात आलेल्या आहेत व त्या मुख्य रस्त्यालगत देखील आहेत. मात्र या जागेवर काही खाजगी व्यक्तींचे अतिक्रमणे केलेली आहेत. या जागेवर पालिकेने या कोठ्या उभाराव्या. मात्र राजस सोसायटी येथील जागेवर सध्या विसर्जन हौद आहे. याचा उपयोग येथील नागरिकांना होत असताना क्षेत्रीय अधिकारी नितीन उदास यांनी याच ठिकाणी कोठ्या उभारण्याचा हट्ट का धरला आहे. या ठिकाणी नागरिकांच्या सुविधेसाठी असलेल्या जागेवर पालिकेने अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नितीन उदास यांना निलंबीत करण्याची मागणी आयुक्तांकडे करणार आहे. वेळ पडली तर न्यायालयातदेखील धाव घेणार.
नगरसेवक प्रकाश कदम यांनी सांगितले, की नागरिकांना अ‍ॅमेनिटी स्पेसच्या जागेवर त्यांना अपेक्षीत सुविधा उपलब्ध करून देणे पालिकेचे कार्य आहे. मात्र पालिका अधिकारी त्यांची सोय या ठिकाणी पाहू लागले आहेत. या नवीन क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या मुख्य रस्त्यालगत २० गुंठ्यांची जागा पालिकेला हस्तांतरित करण्यात आलेल्या आहेत. मात्र त्याचा ताबा पालिकेकडे नाही. त्या जागा भाड्याने दिल्या जात आहेत. याकडे अधिकाऱ्यांनी आधी लक्ष द्यावे व या ठिकाणी आपल्या कोठ्या कराव्यात. राजस सोसायटीच्या त्या अ‍ॅमेनिटी स्पेसच्या जागेत गणपती विसर्जन हौद आहे. त्या ठिकाणी इतर काही अतिक्रमण करू नये, अन्यथा मोठे जनआंदोलन उभारावे लागेल.

बांधकाम नसून तात्पुरत्या कोठ्या

क्षेत्रीय अधिकारी नितीन उदास यांनी सांगितले, की सध्या अधिकाऱ्यांना प्रभाग माहिती नाही. त्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात या कोठ्या बांधणार आहोत. येथे आम्ही कुठलेही बांधकाम करणार नसून फक्त पत्र्याच्या कोठ्या उभारणार आहोत. काही कालावधीनंतर आम्हाला जागा मिळाल्यास त्या कोठ्या तातडीने त्या ठिकाणाहून हलवणार आहोत. सध्या स्थापत्य विभाग नेहरू स्टेडियमवरून या भागात येऊन काम करतो आहे. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. कर्मचाऱ्यांचा वेळदेखील वाया जात आहे. तसेच हे काम करण्यासाठी पालिका उपायुक्तांची परवानगी घेतली आहे.

Web Title: Letter from Amnesty Space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.