पुणे: पुण्याच्या भोर तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्याचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. भोर तालुक्यातील देगांव गावात, घराच्या अंगणात झोपलेल्या पाळीव श्वानावर बिबट्याने हल्ला केल्याचे दिसते आहे. हल्ला करून बिबट्या श्वानाला घेऊन गेला आहे.
देगांव गावातील ठाकरे फार्महाऊस येथे शेतकरी जयानंद काळे हे त्यांच्या घरासमोरील अंगणात खाटेवर झोपले होते. यावेळी त्यांच्या खाटेशेजारी झोपलेल्या त्यांच्या पाळीव श्वानावर बिबट्याने दबक्या पावलाने येत हल्ला चढवला. आणि त्या श्वानाला घेऊन पळून गेला. यामध्ये शेतकरी जयानंद काळे हे थोडक्यात बचावले आहेत. मध्यरात्री 3:30 च्या दरम्यान ही घटना घडली. घटनेनंतर काळे यांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्याने तेथून धूम ठोकली. ही सर्व थरारक घटना त्यांच्या घरासमोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. गेल्या काही दिवसात या परिसरामध्ये बिबट्याचे पाळीव प्राण्यांवरील हल्ले वाढले आहेत. त्यामुळं नागरीकांमध्ये दहशत पसरली. वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे.