मंचर : बिबट्याने दुचाकीवर हल्ला करून तीन जणांना जखमी केल्याची घटना लांडेवाडी येथे रात्रीच्या सुमारास घडली आहे. दुचाकी चालक सुदैवाने बचावला. त्यानंतर दहा मिनिटांतच एका तरुणावर येथेच हल्ला झाला आहे. जखमी चौघांवर उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी विकास भोसले यांनी दिली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार लांडेवाडी ठाकरवाडी रस्त्यावरून लांडेवाडी बाजूकडून ठाकरवाडीकडे संतोष पवार हा दुचाकीवर चालला होता.त्याच्यासोबत ललिता आदिती पवार (वय २५ ), साक्षी आदिती पवार ( वय २), राधाबाई मधुकर वाघे ( वय ४८ ) हे आपल्या घरी जात होते. ठाकरवाडी रस्त्यावर त्यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला करून मागे बसलेल्या तिघांना जखमी केले आहे. या घटनेत दुचाकी चालक याने घटनेची गंभीरता ओळखून तत्काळ वाहन जोरात पळविले त्यामुळे संतोष याच्यावर बिबट्याचा हल्ला झाला नाही.त्याने दुचाकी वाहन सुरक्षितपणे चालवत नेले. मात्र मागे असलेल्या तिघांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.
ही घटना ताजी असतानाच आशुतोष बाळशीराम शेवाळे (वय २६) हा युवक दहा मिनिटांनी याच रस्त्याने जात असताना त्याच्यावर देखील बिबट्याने हल्ला करून जखमी केले आहे. या घटनेची माहिती मिळताच उपसरपंच सचिन ढेरंगे व इतर ग्रामस्थांनी तात्काळ प्राथमिक उपचार करून चारही जखमींना मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले आहे. ढेरंगे यांनी या घटनेची माहिती वनविभागाला दिली.वनपाल एम टी मिरगेवाड, वनरक्षक एस के ढोले व बिबट कृती दलाची टीम घटनास्थळी दाखल झाली.वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची चौकशी करून त्यांच्यावर होणाऱ्या उपचाराची माहिती घेतली. बिबट्याच्या हल्ल्यात एकचवेळी चौघे जखमी झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.