डुडुळगाव शाळेच्या पोषण आहारात अळ्या
By Admin | Updated: August 2, 2014 04:19 IST2014-08-02T04:19:03+5:302014-08-02T04:19:03+5:30
निकृष्ट दजार्चा आहार देणाऱ्या या ठेकेदारावर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे

डुडुळगाव शाळेच्या पोषण आहारात अळ्या
भोसरी : महापालिकेच्या डुडुळगाव येथे असलेल्या प्राथमिक शाळेमध्ये वाटप करण्यात येत असलेल्या शालेय पोषण आहारामध्ये आळ्या सापडल्याने खळबळ उडाली असून सातत्याने निकृष्ट दजार्चा आहार देणाऱ्या या ठेकेदारावर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.
डुडुळगाव शाळेमध्ये सर्व शिक्षा अभियानांतर्गत शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात येते. आज दुपारी आहाराचे वाटप करीत असताना आहारामध्ये आळ्या असल्याचे शिक्षकांच्या निदर्शनास आले. तातडीने हा आहार देण्याचे थांबविण्यात आले. तर ज्या विद्यार्थ्यांना हा आहार वाटण्यात आला होता त्यांच्याकडून हा आहार तातडीने काढून घेण्यात आल्यामुळे अनर्थ टळला. याबाबत महिती देताना प्रभारी मुख्याद्यापक बाळू भांगे यांनी सांगितले की, सप्तशृंगी महिला स्वयंरोजगार या संस्थेच्या वतीने शाळेमध्ये पोषण आहाराचे वाटप करण्यात येते. या संस्थेकडून गेल्या अनेक दिवसांपासून निकृष्ट दजार्चा आहार विद्यार्थ्यांना दिला जात आहे. याबाबत आपण पालिकेच्या शिक्षण मंडळाशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली होती. ठेकेदार बदलण्याबाबतही लेखी पत्र दिले होते, मात्र कोणतीच कार्यवाही झाली नाही. या प्रकाराची माहिती शिक्षण मंडळाला देण्यात आली आहे. आज आहारामध्ये आळ्या सापडल्याने विद्यार्थ्यांमध्ये व शिक्षकांमध्येही अस्वस्थतेचे वातावरण असून उद्यापासून या ठेकेदाराकडून आम्ही शालेय पोषण आहार घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान शाळेसमोरच गावातील नागरिक मोठ्या संख्येने जमले होते. या नागरिकांनी ठेकेदाराच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिल्याचे सांगितले. (वार्ताहर)