दरडी कोसळण्यापूर्वीच लक्षणे जाणून घ्या
By Admin | Updated: August 14, 2015 03:13 IST2015-08-14T03:13:56+5:302015-08-14T03:13:56+5:30
दरडी अचानक कोसळत नाहीत़ त्या कोसळण्यापूर्वी तेथील डोंगरउतार अस्थिर झाल्याची लक्षणे निसर्ग दाखवून देत असतो़ मानवी अतिक्रमणामुळे डोंगरउतार असमतोल निर्माण करणारी

दरडी कोसळण्यापूर्वीच लक्षणे जाणून घ्या
डिंभे : दरडी अचानक कोसळत नाहीत़ त्या कोसळण्यापूर्वी तेथील डोंगरउतार अस्थिर झाल्याची लक्षणे निसर्ग दाखवून देत असतो़ मानवी अतिक्रमणामुळे डोंगरउतार असमतोल निर्माण करणारी क्रिया झाली की दरडी कोसळणे ही निसर्गाची प्रतिक्रिया आहे, असे प्रतिपादन पुणे विद्यापीठ भूशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. सतीश ठिगळे यांनी केले़
डिंभे जलाशयाच्या परिसरातील दरडग्रस्त गावांमध्ये जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़ या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थी आणि तरुण पिढीला दरडी का, कशा, कोठे आणि केव्हा कोसळतात तसेच दरडीची लक्षणे यासंबंधी माहिती डॉ़ ठिगळे यांनी दिली़ त्यांनी असाणे व बेंढारवाडी या गावांना भेट देवून येथील नागरीकांना मार्गदर्शन केले. तर असाणे व पोखरी येथील शाळेतील मुलांनाही भित्तीपत्रके तसेच स्लाईड शोच्या सहाय्याने दरडी कोसळून निर्माण होणा-या दुर्घटनांविषयी माहिती दिली. पर्वत रांगांचा प्रदेश, भुकंप प्रवणक्षेत्र, अतिवृष्टी व मानवीय हस्तक्षेप ही दरडी कोसळण्यामागची प्रमुख कारणे असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील कुशिरे बुद्रुक, कुशिरे खुर्द, जांभोरीची काळवाडी, पोखरीची बेंढारवाडी आदि १३ गावे संवेदनशिल गावे म्हणून समोर आली आहेत.
छोट्या-मोठ्या दरडी कोसळणे म्हणजेच पुढे येणा-या मोठया धोक्याची घंटा आहे. यातील शास्त्रीय कारणे समजून घेवून भविष्यात येणारी मोठी दुर्घटना टाळण्यासाठी गावक-यांनी दरडी कोसळणा-या लक्षणांची चाहूल लागताच सावध राहाण्याचे आवाहन त्यांनी यावेळी गावक-यांना केले. दरडी कोसळण्याचे शास्त्रीय कारण-क्रिया बल व प्रतिक्रिया बल यांची परिमाणे समान असतात. परंतू त्यांच्या दिशा परस्पर विरोधी असतात. हा न्युटनाचा गतीसबंधीचा नियम आहे. त्यानुसार डोंगर उतार असमतोल करणारे मानवी अतिक्रमण ही झाली क्रिया. तर त्यामुळे समतोल ढळून दरडी कोसळणे ही निसर्गाची प्रतिक्रिया असल्याचे त्यांनी सांगितले़
(वार्ताहर)